गजानन मोहोड, अमरावती : पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ फक्त शेतीधारकांनाच मिळतो. याबाबतच्या निकषामध्ये आता केंद्राने बदल केलेला आहे. त्यामुळे राज्यातील ५९,१७२ असुरक्षित आदिवासी गटातील कुटुंबे, (कातकरी कोलम, माडिया गोंड) व वनपट्टाधारक १,९८,९९१ अशा २,५८१६३ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
वनपट्टाधारक (एफआरए) व असुरक्षित आदिवासी गटातील कुटुंबे (पीव्हीटीजी) लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी केंद्र शासनाने कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार जिल्हा माहिती अधिकारी यांच्या मदतीने जनमन योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी यांनी पीएम किसानमध्ये नोंदणी करण्यासाठी प्रमाणित माहिती कृषी विभागाला उपलब्ध करावयाची आहे व योजनेच्या जिल्हा नोडल अधिकाऱ्यांद्वारा केंद्र शासनाने उपलब्ध केलेल्या बल्क डाटा अपलोड सुविधेद्वारे पोर्टलवर तत्काळ अपलोड करायची असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
याबाबत राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जिल्हाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी यांना याविषयी पत्र दिले आहे. त्यानुसार कृषी विभागाद्वारा माहिती घेण्यात येत आहे. या लाभार्थ्यांना लाभाच्या प्रक्रियेत आणले जात असले तरी त्यांना पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचा लाभ मिळणार की नाही, याविषयी संभ्रम आहे.