प्रदीप भाकरे, अमरावती: पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा छत्रीतलावात बुडून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास ती घटना उघड झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील शोध व बचाव पथकाने ते दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. शेख उमर लिलगर मेहबूब लिलगर (१९) व अयान शहा राजीक शहा (१६, दोघेही रा. कुंभारवाडा, फ्रेजरपुरा) अशी मृतांची नावे आहेत.
बकरी इद साजरी करून ते एकाच परिसरात राहणारे दोघेही पोहण्यासाठी गेले होते. मात्र, दोघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. काही प्रत्यक्षदर्शीनी ती माहिती पोलीस व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. दुपारी १.४० च्या सुमारास दोन युवक बुडाल्याची माहिती मिळताच शोध व बचाव पथक दुपारी दोनच्या सुमारास छत्रीतलाव येथे पोहोचले. तात्काळ रेस्क्यू टीममधील गोताखोरांनी गळ व हुकच्या साह्याने शोधकार्याला सुरुवात केली. अथक प्रयत्नानंतर दोन्ही मृतदेह पथकाच्या हाती लागले. ते मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनाकरीता पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले. कुटुंबियांनी मृताची ओळख पटविली.
दरम्यान दोन युवक बुडाल्याची माहिती मिळताच फ्रेजरपुरा परिसरातील अनेकांनी छत्रीतलाव परिसरात एकच गर्दी केली. ऐन इदच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे दोघांच्याही कुुटुंबावर शोककळा पसरली आहे.
यांनी केले रेस्क्यू
निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथकातील सचिन धरमकर, दीपक डोरस, दिपक पाल, गजानन वाडेकर, विशाल निमकर, दिलीप भिलावेकर, आकाश निमकर, अर्जुन सुंदरडे, गणेश जाधव व दीपक चिल्लोरकर यांनी दोघांचे मृतदेह छत्री तलावाबाहेर काढले.