शहानूर, सापन, चंद्रभागा धरणांचा जलसाठा वाढला.
कॅप्शन फोटो
सापान नदीची दहा सेंटिमीटरने दारे उघडण्यात आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नरेंद्र जावरे
परतवाडा : मेळघाटात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अचलपूर तालुक्यातील सापन धरणाची पहिल्या व चौथ्या क्रमांकाची दारे दहा सेंटिमीटरने गुरुवारी सकाळी ११ वाजता उघडण्यात आली. सापन नदीपात्रातील गावांना दक्षतेचा इशारासुद्धा देण्यात आला आहे. शहानूर, सापन व चंद्रभागा या तीनही धरणांच्या जलसाठ्यात वाढ होत असून, सापन धरणात आवक वाढल्याने अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.
सापन मध्य प्रकल्पात २२ जुलै रोजी पाण्याची आवक वाढल्याने गुरुवारी पहिल्या व चौथ्या क्रमांकाची दरवाजे 10 सेंटिमीटरने उघडण्यात आली असल्याचे प्रकल्पाचे उपअभियंता सुबोध इंदूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, तर चंद्रभागा प्रकल्पाचा जलसाठासुद्धा वाढत असून, मेळघाटात कोसळलेल्या पावसामुळे चिखलदऱ्यातील कार्यक्षेत्रात झालेला मुसळधार पाऊस पाहता चंद्रभागा प्रकल्पाची जलाशय पातळी १.५ मीटरने वाढल्याची माहिती कनिष्ठ अभियंता ओमकार पाटील व ऋषिकेश घुरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. चिखलदरा येथे 132 मिलिमीटर, तेल खार येथे 99 किलोमीटर अंतर, मोझरी येथे 36 मिलिमीटर व चंद्रभागा धरणावर केवळ चार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.