अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत ३८४ महाविद्यालयांमध्ये प्रवेशित १८ वर्षांवरील सुमारे २ लाख १३ हजार ८०६ विद्यार्थी लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. उच्च शिक्षण विभागाच्या पत्रानुसार विद्यापीठाने लसीकरणाच्या अनुषंगाने आवश्यक माहिती मंगळवारी शासनाकडे पाठविली आहे.
राज्य शासनाने १८ ते ४४ वर्षे वयोगटातील तरुणांचे १ मेपासून लसीकरण सुरू केले. विद्यार्थ्यांना प्रवेशित महाविद्यालयात लसीकरणाचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाने जिल्हा, तालुका, गावनिहाय विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याची कार्यवाही आरंभली आहे. ही माहिती विद्यापीठाने ई-मेलवर पाठविली. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या आदेशानुसार परीक्षा विभागाने कमी वेळेत विद्यार्थ्यांची माहिती पाठविण्याची कामगिरी केली. कोविड-१९ या आजारापासून विद्यार्थी सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच विशेष शिबिराच्या माध्यमातून लस टोचली जाणार आहे.
-------------------
अशी पाठविली महाविद्यालयनिहाय माहिती
विद्यार्थ्यांचे नाव, महाविद्यालयाचे नाव, विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर, आधार क्रमांक, ई-मेल, विद्यार्थी शिकत असलेला वर्ग, लिंग, जिल्हा, तालुका, गावाचे नाव, जन्मतारीख आणि वय ही सर्व माहिती महाविद्यालयनिहाय मेल करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या डिजिटायझेशनच्या बळावर लर्निंग स्पायरल कंपनीच्या मदतीने अवघ्या तीन तासांत ही माहिती पाठविण्यात आली. यात अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
-----------------------
शासनाने लसीकरणाच्या अनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा डेटा मागविला होता. तो मंगळवारी दुपारी १२ वाजता ई-मेल करण्यात आला. महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांना लवकरच लस उपलब्ध होईल, असे संकेत आहेत.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.
---------------