पान २ चे लिड
फोटो पी १४ हनवतखेडा
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत हनवतखेडा येथे शासकीय मालमत्तेची गैरमार्गाने विल्हेवाट लावत घडलेल्या कोंडवाड्याच्या भूखंड घोटाळ्यातील श्रीखंडावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात १५ जून रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. ही सुनावणी झूम ॲप वर घेतली जाणार आहे. यात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तत्कालीन सरपंच व ग्रामसचिव आणि तक्रारदारास हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भूखंड घोटाळ्याचा चौकशी अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी १९ एप्रिल २०२१ रोजी आपल्या अभिप्रायासह जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे. यात तत्कालीन सरपंच व सचिव यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्वपरवानगी न घेता त्या कोंडवाड्याच्या जागेचा नियमबाह्य मोबदला ३० मे २०१९ रोजी करून दिला. या मोबदला लेखमध्ये गजानन बानाईत यांच्या जागेची बाजारभाव किंमत रुपये ४० हजार इतकी आहे, तर ग्रामपंचायत कोंडवाड्याच्या जागेची बाजार भाव किंमत रुपये २ लाख ६० हजार इतकी आहे. त्यामुळे तफावत रक्कम २ लाख २० हजार असून, या रकमेस तत्कालीन सरपंच दीपमाला सरदार व तत्कालीन सचिव विनय जाधव हे समप्रमाणात दोषी आहेत. संबंधित भूखंड प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्व परवानगी न घेता तत्कालीन सरपंच व सचिव यांनी ही अनियमितता केल्याचे दिसून येते, असे गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या चौकशी अहवालात अभिप्रायासह स्पष्ट केले.
बॉक्स
चौकशी अहवालातून शिक्कामोर्तब
कोंडवाडा भूखंड प्रकरणात हनवतखेडा येथील दीपक घोम यांनी तक्रार केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने त्या भूखंडावरील सुरू असलेले बांधकाम सध्या थांबविण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या चौकशी अहवालात त्या भूखंडप्रकरणी घडलेल्या २ लाख २० हजारांच्या ‘श्रीखंडा’वर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.