अमरावती : अनलॉकनंतर हळूहळू एसटी महामंडळाकडून बसफेऱ्यांद्वारे प्रवासी वाहतूक पूर्वपदावर येत आहे. परंतु, अद्यापही केवळ ८० टक्के बस रस्त्यावर धावत असून, २० टक्के आगारातच आहेत. त्यामुळे बहुतांश प्रवाशांना खासगी वाहतुकीच्या साधनांचा वापर प्रवासासाठी करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर उर्वरित बसमधून प्रवासी वाहतूक लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभने यांनी सांगितले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटी महामंडळाच्या बसची चाके थांबली होती. अशातच अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास या प्रशासनाच्या नियमामुळे प्रवासीही घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे एसटीच्या केवळ बोटावर मोजण्याइतकेच फेऱ्या सुरू होत्या. त्यानंतर अनलॉकची घोषणा होताच एसटी बस व फेऱ्यांची बस संख्या वाढविण्यात आली. अमरावती मध्यवर्ती आगारातून आजघडीला ८० टक्के बस रस्त्यावर धावत आहेत. अद्याप २० टक्के बस आगारात उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. परिणामी प्रवाशांना प्रवासासाठी खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता, उर्वरित एसटी बसची वाहतूकही प्रवाशांसाठी सुरू करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत अनेक गावांमध्ये बस सुरू नसल्यामुळे खासगी वाहनांनी प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
बॉक्स
एकूण बस ६२
सध्या सुरू असलेल्या बस - ५०
आगारात उभ्या असलेल्या बस - १२
एकूण कर्मचारी -३४८
चालक -११३
वाहक -१३८
सध्या कामावर चालक - ११३
सध्या कामावर वाहक -११८
बॉक्स
या गावांना नाहीत बस
सध्या अमरावतीहून मध्य प्रदेशात होणारी वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे लांब पल्ल्याच्या ६, मध्यम पल्ल्याच्या ७, सर्वसाधारण ४० बस सुरू आहेत. याशिवाय जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिरजगाव मोझरी, वाई, साऊर, सोनोरी व अन्य काही गावांमध्ये जाणाऱ्या एसटी बसच्या फेऱ्या सध्या बंद आहेत. विशेष म्हणजे, शाळा-महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थिनींसाठी सोडण्यात येणाऱ्याही फेऱ्या बंद आहे. त्यामुळे बंद असलेल्या बसफेऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे.
बॉक्स
खासगी वाहनांचा आधार
एसटी महामंडळाची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे मध्य प्रदेशासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची संख्या कमी आहे. यामुळे प्रवाशांना खासगी वाहतूक करणारी वाहने धुंडाळावी लागतात. अशातच महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी जाण्याची वेळ आली तरीदेखील एसटी बस ऐवजी खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. एसटी महामंडळाच्या बस शंभर टक्के रस्त्यावर येईपर्यंत प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागणार आहे.
कोट
एसटी महामंडळाने बस सुरू केल्या असल्या तरी ग्रामीण भागातील अनेक ठिकाणच्या फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे कामासाठी शहरात जायचे झाल्यास ग्रामीण भागातील प्रवाशांना नाइलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे बंद असलेल्या बस सुरू करण्याची गरज आहे.
- दादाराव काडगळे, प्रवासी
कोट
एसटी बस बंद असल्याने खासगी वाहनाने जादा पैसे माेजून प्रवास करावा लागत आहे. त्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली होते. त्यामुळे एसटी बस सुरू करण्याबाबत एसटी महामंडळाने त्वरीत निर्णय घ्यावा.
- पंजाबराव उके, प्रवासी