वरूड : स्थानिक रिंग रोडवर वर्दळीच्या ठिकाणी असलेले एटीएम फोडून चोरट्यांनी कॅश ट्रे पळविला. त्यामधील २० लाख ७५ हजार रुपयांची रक्कम त्यांनी लंपास केली. या दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरेदेखील फोडले. एका निवासस्थानावर लावलेल्या सीसीटीव्हीत एक चोरटा कैद झाला आहे. एका वर्षात तालुक्यातील एटीएम फोडण्याची तिसरी घटना आहे.
पोलिस सूत्रांनुसार, स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिंग रोडला एटीएम आहे. रात्री सुरक्षा रक्षक नसल्याने बेवारस असते. मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएमसह आजूबाजूचे प्रथम सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. नंतर एटीएम फोडून नोटांच्या ट्रेसह पळ काढला. यामध्ये २० लाख ७५ हजार ८०० रुपयांची रक्कम असल्याचे सांगण्यात आले. याबाबत वरूड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. गॅस कटरने एटीएम मशीनचा पत्रा कापून रकमेवर डल्ला मारल्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. हा प्रकार येथील रहिवासी अनिल हेटे यांच्या घरावर लागलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला.
एपीआय दीपक महाडिक, लक्ष्मण चिंचोलेसह वरूड पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे, पोलिस उपनिरीक्षक नितीन चुलपार, रवी बावणे, गजेंद्र ठाकरे, शकील चव्हाण, पंकज फाटे, भूषण पेठे यांच्यासह ठसेतज्ज्ञ प्रशांत तांबुलकर, छायाचित्रकार राजेश गुहे, फॉरेन्सिक सहायक प्रदीप लहुटकर, अक्षय रेवाडकर आदींनी घटनास्थळ गाठले. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळ गाठून बारकाईने तपास केला.
एकजण कॅमेऱ्यात कैदएटीएम फोडणाऱ्या टोळक्यातील एकाच्या हालचाली हेटे यांच्याकडील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या. तथापि, नेमके किती जणांनी ही चोरी केली, याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नसल्याचे प्रभारी ठाणेदार सतीश इंगळे यांनी स्पष्ट केले.