अमरावती : राजस्थान येथील अजमेर येथून हिऱ्याची चोरी करून अमरावतीत दडून राहणाऱ्या चोरट्याचा शोध घेत असताना स्थानिक गाडगेनगर पोलिसांनी एका महिलेकडून २० लाख रुपयांच्या हिऱ्याच्या दागिन्यांसह वाहन असा २५ लाखांचा मुद्देमाल गुरुवारी जप्त केला. तिला हबीबनगर- २ मधून अटक करण्यात आली.
दिल्ली येथील एका व्यापारी पत्नीसह राजस्थानच्या अजमेर येथील दर्ग्यात दर्शनासाठी गेले होते. ९ मे रोजी त्या व्यापाऱ्याच्या पत्नीच्या बॅगमध्ये असलेले २० लाख रुपयांचे हिरेजडित दागिने चोरीला गेले. फुटेजमध्ये एक महिला दागिने चोरताना आढळून आली. त्या फुटेजच्या आधारे लॉजची तपासणी केली असता, ती महिला एका लॉजमध्ये थांबल्याचे लक्षात आले. तिचा पत्ता हबीबनगर नं २ अमरावती असल्याचे समोर आले. सबब, अजमेर पोलिसांनी गाडगेनगर पोलिसांची मदत घेतली. तिला दागिन्यांसह अटक करण्यात आली. यात तिचा पती आरोपी वसीम अली नूर अली (३६) याचादेखील सहभाग स्पष्ट झाला. तो गवसला नसला तरी तपासादरम्यान गुन्ह्यात सहभागी असलेली त्याची पत्नी असिर कॉलनीत भावाकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी असिर कॉलनीत तिचा शोध घेतला असता, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी (क्र. एमएच १२ केएन २५७९) आढळली. महिलेला अटक केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. पांढरी कार, हिऱ्याचा सोन्याने मढवलेला हार, एक अंगठी, हिरेजडित दोन नग तसेच पांढऱ्या हिऱ्याची एक रिंग असा २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी महिलेला अटक केली.
पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस उपायुक्त एम. एम. मकानदार, सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांच्य मार्गदर्शनात गाडगेनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले, सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक पंकज ढोके, हेड कॉन्स्टेबल इशय खांडे, नीळकंठ गवई, अनिल तायवाडे, गजानन बरडे, आस्तिक देशमुख, सचिन बोरकर, परवेज, उमेश उईके, अथर अली बेग, चालक बुधवत परजणे यांनी ही कारवाई केली.