अमरावती : पश्चिम विदर्भात १७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पावसाने किमान १९ लाख ९३ हजार १३२ हेक्टरमधील खरिपाची पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर झाला आहे. खरिपाच्या एकूण पेरणी क्षेत्राच्या ६३.९० टक्के क्षेत्रातील खरिपाची पिके उद्ध्वस्त झालेली आहेत. विभागात १७ लाख ३६ हजार २५५ शेतकºयांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे.
विभागीय आयुक्तांच्या प्राथमिक अहवालानुसार अमरावती जिल्ह्यात ३ लाख ५१ हजार ५९८ हेक्टर, अकोला जिल्ह्यात ३ लाख २३ हजार ६६२ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ८६ हजार ५३० हेक्टर, बुलडाणा जिल्ह्यात ५ लाख ५१ हजार ४०४ हेक्टर व वाशीम जिल्ह्यात २ लाख ७९ हजार ९३८ हेक्टरमधील खरीप पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. या सर्व क्षेत्रात पंचनामे आता अंतिम टप्प्यात असून, साधारणपणे बुधवारी विहित प्रपत्राच्या माहितीनुसार शासनाला अहवाल सादर होणार आहेत.
अमरावती विभागात यंदाच्या हंगामात एकूण ३१ लाख १८ हजार ७०० हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी झाली. सुरुवातीला पावसात खंड राहिल्याने मूग व उडीद ही ६० दिवसांच्या कालावधीतील पिके बाद झाली. कमी पावसामुळे सोयाबीनची दुबार पेरणी बहुतांश क्षेत्रात करण्यात आली. यामधून शेतकरी सावरत नाही तोच ऑगस्टपासून पावसाने दीड महिने जेरीस आणले. यात पिकांची वाढ खुंटून कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. आता सोयाबीनचा हंगाम सुरू झाला असताना तब्बल दहा दिवस परतीच्या पावसाने झोडपून काढले. शेतात पाणी साचल्याने उभे पीक सडले. कपाशीची बोंडे सडली आहेत. कापूस ओला झाला.
सरकीला कोंब फुटले. शेतातील उभे सोयाबीन जाग्याबर सडले. गंजीत कुजले. शेंगाला बिजांकुर फुटले, मका, धान व इतर पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. कृषी विभागाने नजरअंदाज अहवाल सादर केला. त्यात १२ लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे. प्राथमिक अहवालानुसार १९ लाख ९३ हजार १३२ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर बाधित क्षेत्राची आणखी क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
जिल्हा गावे शेतकरी क्षेत्रअमरावती १६०६ ३२०१९९ ३५१५९८अकोला १००६ २९३५८८ ३२३६६२यवतमाळ २००८ ४६७४६६ ४८६५३०बुलडाणा १४२० ४८०६४५ ५५१४०४वाशिम ७९५ १७४३५७ २७९९३८एकूण ६८३५१७ १७३६२५५ १९९३१३२