फोटो पी २१ धामणगाव रेल्वे
पान २ चे सेकंड लिड
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल भाजीपाला मार्केटमध्ये न नेता तो थेट ग्राहकांपर्यंत पोहोचेल, यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेत तालुक्यातील तब्बल दोनशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी आपल्या शेतीच्या बांधावरच भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले आहे.
दहा वर्षांपासून शेतकऱ्यांची अवस्था निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे दिवसेंदिवस बिघडत आहे. दरवेळी उत्पन्न कमी आणि खर्च अधिक ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकवलेला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागतो. व्यापारी भाजीपाला असो की संत्री, मोसंबी, शेतकऱ्यांकडून कमी भावात खरेदी करून बाजारात अधिक भावाने ग्राहकाला विक्री करतो. त्यामुळे आता राज्य शासनाने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, यासाठी शासनाने ‘विकेल ते पिकेल’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतमाल व भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करता येतो.
धामणगाव रेल्वे तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संत सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत तालुक्यात प्रत्येकी ११ शेतकऱ्यांचे शंभर गट तयार करण्यात येत असून, या शेतकऱ्यांना शेताच्या बांधावरच विक्री केंद्र उभारावे लागणार आहेत. ताजा भाजीपाला बांधावर मिळत असल्याने ग्राहकांनी या भाजीपाल्याला पहिली पसंती दाखवली आहे. देवगाव, जुना धामणगाव या भागात उभारलेल्या विक्री केंद्रावर ग्राहक स्वत:हून भाजीपाला खरेदी करीत आहेत.
कोट
शासनाच्या ‘विकेल ते पिकेल’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. धामणगाव तालुक्यात ११०० शेतकरी या योजनेत जोडले गेले आहेत.
सागर इंगोले
तालुका कृषी अधिकारी, धामणगाव रेल्वे
कोट २
आम्ही सुरू केलेल्या विक्री केंद्रावर ग्राहक स्वत: येऊन ताजा भाजीपाला खरेदी करीत आहेत. या केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नीलेश तिंतुरकर, देवगाव
---------