लोकमत दिन विशेष
फोटो - येत आहे.
संजय जेवडे - नांदगाव खंडेश्वर : १९९८ मध्ये नांदगाव खंडेश्वर या बहुधा ग्रामीण भागात गणल्या जाणाऱ्या तालुकास्थळी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार तथा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त शिक्षक सदानंद जाधव यांनी एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीचे बीज रोवले. या अकादमीतून सराव करून निघालेल्या खेळाडूंनी आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवर २०० हून अधिक, तर राज्यस्तरावर ४९१ पदकांची लयलूट केली आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी, मजुरांची मुले योग्य प्रशिक्षण लाभल्यास चमक दाखवू शकतात, हे हेरून सदानंद जाधव यांनी पाच ते सहा खेळाडूंच्या बळावर अकादमीत प्रशिक्षण सुरू केले. आता दिवसाला ७० ते ८० खेळाडू नियमित सरावासाठी मैदानावर असतात. २००४ मध्ये शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघातील २४ पैकी १४ खेळाडू एकलव्य अकादमीचे होते. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वर्णी लागण्याची ओढ निर्माण झाली असली तरी त्यासाठी आधुिनक साहित्याची अडचण होती. तथापि, तोपर्यंत अकादमीत प्रशिक्षण घेत असलेली आंतरराष्ट्रीय खेळाडू वृषाली गोरलेचे पालक व सदानंद जाधव यांनी २००६ मध्ये कम्पाऊंड गटातील जुना धनुष्य खरेदी केला. अन्य कुठल्याही सुविधा नसताना प्रशिक्षण व जिद्द या बळावर वृषाली २००८ मध्ये तब्बल तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघात निवडली गेली. अनेक स्पर्धा तिने गाजवल्या आणि अकादमीलाही प्रतिष्ठा मिळवून दिली.
अकादमीमार्फत विविध स्पर्धांमधून यश मिळविलेल्या खेळाडूंनी महाराष्ट्र शासनाची क्रीडा प्रबोधिनी, भारतीय खेळ प्राधिकरण (साई) अंतर्गत सुविधा प्राप्त करून आणखी मोठे व्यासपीठ मिळविले. अकादमीचे ३५ खेळाडू पाच टक्के क्रीडा कोट्यातून गट ‘अ’ ते गट ‘ड’ च्या विविध पदांवर शासकीय नोकरीत आहेत.
--------------
प्रशिक्षकाची उणीव भरून काढली
वाढत्या स्पर्धांबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांची गरज अकादमीला जाणवत होती. तेव्हा सदानंद जाधव यांनी आपला मुलगा व अकादमीचा राष्ट्रीय खेळाडू अमर जाधव याला कोलकाता येथे पाठविले. त्यांनी धनुर्विद्या या खेळाची एनआयएस पदविका प्राप्त केली. ते खेळाडूंना नि:शुल्क प्रशिक्षण देतात. विशेष म्हणजे, ते पोलंड येथे ऑगस्टमध्ये झालेल्या जागतिक युवा धनुर्धर अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षक होते.
-------------------
कोट येत आहे.