लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : लॉकडाऊनच्या काळात मेळघाटात ग्रामपंचायतींकडून नियमांचे पालन करीत आदिवासी मजुरांसाठी मग्रारोहयो अंतर्गत कामे सुरू केली आहेत. तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींमध्ये दोन हजारांवर मजूर कामावर उपस्थित आहेत. त्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप सोमवारी चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी मोथा येथे कामाच्या पाहणीदरम्यान सोमवारी केले.कोरोनामुळे २३ मार्च रोजी देश लॉक डाउन त्यामुळे मेळघाटातील गोरगरीब आदिवासीच्या हातांना काम नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. अशात मग्रारोहयो अंतर्गत कामे पूर्ण बंद पडली होती. गत आठवड्यापासून घरकुल, सीसीटी, वृक्षलागवड आदी कामे ग्रामपंचायतीमार्फत सुरू करण्यात आली. १९ ग्रामपंचायती अंतर्गत दोन हजारांपेक्षा अधिक मजुरांची उपस्थिती कामावर आहे. मोथा, मडकी गावात या कामांना भेट देऊन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी मजुरांचे प्रबोधन केले. पंचायत समितीमार्फत मजुरांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. सोशल डिस्टस्टिंग पाळण्याचे आवाहन केले.कोरोना मुळे नवीन नियमावलीरोजगार हमीच्या मजुरांनी सोशल डिस्टस्टिंग पाळावे. दोन मजुरांमध्ये किमान एक ते दोन मीटर अंतर ठेवावे. काम करताना नेहमी तोंडाला मास्क लावावा. मास्क पंचायत समितीकडून पुरवण्यात येत आहे. वैयक्तिक स्वच्छता पाळावी. दर एक तासाला हात साबणाने स्वच्छ धुवावे. वरचे वर हाताला अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर लावावे. काम करताना किंवा इतर ठिकाणी वावरताना गर्दी करू नये.कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउनचे पालन करावे. गावात, सार्वजनिक ठिकाणी, दुकानात गर्दी करू नये. प्रशासनाला सहकार्य करावे. आपल्या काही अडचणी असतील, तर व्हॉट्सअॅप किंवा रोजगार सेवकामार्फत प्रशासनाला कळवाव्यात. रोजगार सेवक, तांत्रिक अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी मजुरांचे आरोग्य चांगले राहील याची काळजी घ्यावी. कोणत्याही मजुराला ताप/थंडी/खोकला अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यातर्फे करण्यात आले आहे.
मग्रारोहयो अंतर्गत विविध कामे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येत आहे. दोन हजारांवर मजूर असून, त्यांच्यासाठी लॉकडाऊन अंतर्गत नियमावली लागू करण्यात आली आहे. मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे.- प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, चिखलदरा