अमरावती : दोन दिवसांपासून ठणठणात असलेल्या कोविशिल्ड लसीच्या २० हजार डोसचा पुरवठा सोमवारी जिल्ह्यास झालेला आहे. हा साठा देखील दोन दिवस पुरणार इतकाच आहे. याशिवाय कोव्हॅक्सिनचा साठा निरंक असल्याने लसीकरणाचा ‘उत्सव’ कसा साजरा करावा, हा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर निर्माण झालेला आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झालेले आहे. तेव्हापासून पहिल्यांदाच अशी स्थिती उद्भवली आहे. जिल्ह्यात साधारणपणे १२५ केंद्रांवर लसीकरण होत आहे. मात्र, लसीचा साठा संपल्यामुळे ज्या केंद्रावर कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा साठा होता, त्यांनी साठा असेपर्यंत लसीकरण केले. आता तेही केंद्र बंद पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाच ते सहा केंद्र वगळता सर्व केंद्र लसीच्या साठ्याअभावी बंद पडलेले आहेत.
जिल्ह्याने ४.५० लाख लसींच्या डोसची मागणी नोंदविली असताना सोमवारी फक्त २० हजार डोस प्राप्त झालेले आहेत. यापैकी पाच हजार डोज महापालिकेच्या लसीकरण केंद्राला देण्यात आले. उर्वरित डोस प्रत्येक तालुक्याला प्रत्येकी एक हजार याप्रमाणे देण्यात आल्याने मंगळवारपासून जिल्ह्यातील कोव्हॅक्सिनचे लसीकरण सुरू होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी सांगितले.
बॉक्स
रविवारी १,०९१ जणांचे लसीकरण
जिल्ह्यातील ज्या केंद्रावर थोडाफार लसीचा साठा होता, तेथे रविवारी १,०९१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात कोविशिल्ड लसीचा साठा निरंक असल्याने ज्या केंद्रावर कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे, त्याच केंद्रांवर रविवारी लसीकरण झाले. यात हेल्थ केअर वर्कर १४, फ्रंट लाईन वर्कर २७ व ४५ वर्षांवरील ३२४ तसेच ६० वर्षांवरील ३२४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.