संघटना माघारल्या : आश्वासनांचा भडीमार, मागणी रेटून धरलीच नाहीअमरावती : सेमाडोह येथील मुख्याध्यापक विजय नकाशे यांच्या आत्महत्येला आज २१ दिवस पूर्ण झालेत. मात्र त्यांच्या कुटुंबीयांच्या हाती ठोस असे काहीही लागले नाही. या तीन आठवड्यांत खासदार, आमदारांसह अनेकांनी नकाशेंच्या घरी जाऊन आश्वासन दिली, सांत्वनही केले. २८ नोव्हेंबर रोजी या घटनेला २१ दिवस पूर्ण झालेत. अद्याप त्यांनी रेटून धरलेली कुठलीही मागणी पूर्ण झालेली नाही किंवा त्या मागण्या पूर्ण होण्याच्या पाऊलखुणाही दिसत नाहीत. एकंदरीत नकाशे आत्महत्या प्रकरणानंतर २-४ दिवस दु:ख व्यक्त करणाऱ्या संघटनास्तरावर हा मुद्दा बेदखल झाला आहे. नकाशे कुटुंबीयांनाच आता ही लढाई एकट्याने लढावी लागणार असल्याचे सध्याचे दुर्देवी चित्र आहे.७ नोव्हेंबरला पीआरसी सदस्यांसह अन्य अधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने विजय नकाशे यांनी स्वत:ला संपवून घेतले होते. त्यानंतर विविध संघटना समोर आल्या होत्या. तथापि आता सर्व स्तरावर स्मशान शांतता आहे. पंचायतराज समितीच्या ४ सदस्यांसह इतर अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी स्व. विजय यांच्या पत्नी नीता, सासरे दादराव वानखडे यांच्यासह शिक्षक संघटनांनी केली. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेनुसार नीता नकाशे यांना विशेष बाब शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी समोर आली. सुरुवातीचे ८-१० दिवस हा प्रश्न सातत्याने लावून धरण्यात आला. तथापि आता या विषयावर कुणीही बोलायला तयार नाही. (प्रतिनिधी)
नकाशेंच्या आत्महत्येनंतरचे २१ दिवस...
By admin | Published: November 29, 2015 12:54 AM