अमरावती : राज्यातील कोट्यवधी जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागात सद्य:स्थितीत एकही संचालक व अतिरिक्त संचालक नाही. याशिवाय सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक अशी महत्वाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. एकंदरीत आरोग्य खात्यात २१७५ वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, यात 'क्लास वन' ९५४ तर 'क्लास टू' च्या १२२१ पदांचा वानवा आहे. त्यामुळे संपूर्ण 'आरोग्य सेवा' वाऱ्यावर असून आरोग्य विभाग 'सलाईन'वर चालत आहेत. आरोग्य यंत्रणेत रिक्त पदांबाबत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याशी सातत्याने मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
शहर आरोग्य संचालक रिक्तच
कोरोना काळात शहरी भागातील विशेषतः महानगरपालिका या ठिकाणी आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आरोग्य संचालक (शहर) हे नवीन पद निर्माण करण्यात आले. त्यासोबत उपसंचालक-२ पदे, सहाय्यक संचालक -४ पदे अशी एकूण ६ पदे अशी नवीन यंत्रणा उभी केली होती. यावर मंत्रिमंडळात शिक्कामोर्तबही झाले होते. परंतू ही यंत्रणा कचाट्यात सापडली आहे.
अशी आहे वर्ग १ व २ ची रिक्त पदे
सार्वजनिक आरोग्य विभागात सद्यस्थितीत संचालक ४, अतिरिक्त संचालक ४, सहसंचालक ०५, उपसंचालक २३, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग १२१, जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग ३३८, विशेषज्ञ संवर्ग ४५९ अशी एकूण ९५४ वर्ग १ च्या अधिका-यांची पदे रिक्त आहेत. तर वर्ग २ गट- अ पदांच्या एमबीबीएस वैद्यकीय अधिका-यांची ९८३, बीएएमएस वैद्यकीय अधिका-यांची २३८ अशी एकूण १२२१ पदे रिक्त आहेत.