अमरावती : जिल्ह्यात वर्ष २०२२-२३ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये ‘हिपॅटायटीस-बी’चे २१८, तर ‘सी’चे १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम केंद्राने दिली आहे. चाचण्या वाढल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत रुग्णांची संख्याही वाढलेली आहे. ‘हिपॅटायटीस-बी’च्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ५४ गर्भवती महिला, १५ कारागृातील कैदी, तर १३ एचआयव्हीग्रस्तांचाही समावेश आहे.
देशात यकृत बिघडण्याचे सर्वाधिक दिसून येणारे कारणे म्हणजे, ‘हिपॅटायटीस बी’ हे आहे. हा हिपॅटायटीस विषाणू बऱ्याच प्रकारे शरीरात प्रवेश करू शकतो. दूषित रक्त पुरवठा, तसेच असुरक्षित लैंगिक संबंधातून हा विषाणू मोठ्या प्रमाणावर पसरत असून, या विषाणूची लागण क्षमता ही एचआयव्ही विषाणूपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे हिपॅटायटीस आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम केंद्र प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे २०१९ मध्ये हे केंद्र सुरू झाले असून, या केंद्राला राज्यातील मॉडेल केंद्राचा दर्जाही देण्यात आल्याची माहिती रुग्णायल प्रशासनाने दिली.
हिपॅटायटीसचे एकूण पाच प्रकारहिपॅटायटीस विषाणूचे एकूण पाच प्रकार आहेत. यामध्ये ‘हिपॅटायटीस-ए’ हा दूषित पाणी किवा दूषित अन्नामुळे पसरतो. ‘हिपॅटायटीस-बी’ हा दूषित रक्त, लैंगिक संबंध, दुसऱ्या व्यक्तीने वापरलेली सुई, ब्लेडच्या वापरामुळे होतो. एचआयव्हीबाधित, गर्भवती महिला व डायलिसिस रुग्णांना याची लागण होण्याची शक्यता जास्त असते. ‘हिपॅटायटीस-सी’ हा रक्ताच्या माध्यमातून होतो, संक्रमित रुग्णांची लाळ, वीर्य किवा योनिमार्गातील द्रव पदार्थातून याचा संसर्ग पसरतो. ‘हिपॅटायटीस-डी’ हा विषाणू ‘हिपॅटायटीस-बी’ असलेल्या रुग्णांमध्ये आढळून येतो. तर ‘हिपॅटायटीस-ई’चा संसर्ग सौम्य आणि अत्यंत कमी काळाकरिता होतो. शासकीय रुग्णालयांत मोफत उपचारहिपॅटायटीसचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी शासकीय रुग्णालयामध्ये मोफत तपासणी व मोफत औषधोपचार केले जातात. राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम केंद्राअंतर्गत या सुविधा पुरविल्या जातात. वर्ष २०२२-२३ मध्ये ‘हिपॅटायटीस-बी’च्या ४१८४२ चाचण्यांमध्ये २१८ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. तर ‘हिपॅटायटीस-सी’च्या १४४१८ चाचण्यांमध्ये १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम केंद्र रुग्णालयात सुरू झाल्यापासून ‘हिपॅटायटीस-बी’ व ‘सी’च्या चाचण्या वाढल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत आहे. या विषाणूचे लवकर निदान झाल्यास या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. डॉ. प्रीती मोरे, विशेष भिषक, वर्ग- एक अधिकारी, इर्विन