अमरावती : भारतीय जनसंचार संस्थान, पश्चिम विभागीय केंद्र अमरावती व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन वेबिनार शनिवारी दिल्ली येथील भारतीय जनसंचार संस्थानचे महानिदेशक प्रा. संजय द्विवेदी यांच्या विशेष उपस्थितीत पार पडला.
२१ व्या शतकाच्या सध्याच्या युगात अनुवाद ही एक अत्यावश्यक गरज बनली आहे. भारतासारख्या बहुभाषिक देशातील लोकांमध्ये संवादाचे वाहक म्हणून अनुवादाला विशेष महत्त्व आहे. म्हणून, जर आजच्या युगाला 'भाषांतराचे युग' असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही, असे मत व्यक्त करून संजय द्विवेदी यांनी बहुभाषिक संवाद आणि अनुवादाचे महत्त्व पटवून दिले. हिंदी पखवाडाच्या समारोपानिमित्त ' राष्ट्रीय संदर्भात बहुभाषिक संवाद आणि अनुवादाचे महत्त्व ' या विषयावर २५ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या मराठी व हिंदी भाषा विभागप्रमुख प्रा.डॉ. मोना चिमोटे यांच्या अध्यक्षतेखाली वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर वेबिनारमध्ये वक्ते म्हणून साहित्यिक डॉ.पृथ्वीराज तौर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, डॉ. मृणाल चटर्जी क्षेत्रीय निदेशक भारतीय जनसंचार संस्थान, ढेंकनाल, ओडिशा यांनीसुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले. विषय मांडणी भारतीय जनसंचार संस्थान नवी दिल्लीचे अधिष्ठाता (अकादमीक) प्रा. गोविंद सिंह यांनी केली. संचालन विनय सोनुले, तर आभार प्रदर्शन भारतीय जनसंचार संस्थेचे पश्चिम क्षेत्रीय निदेशक प्रा. अनिलकुमार सौमित्र यांनी केले.