फोटो १६एएमपीएच०२, ०३, ०४
कॅप्श्न - शिराळा येथे मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्यानंतर असे विस्कळीत झाले. (छाया - मनीष तसरे, अमरावती)
अमरावती : अमरावती ते नरखेड रेल्वे मार्गावरील वलगावनजीकच्या शिराळा येथे रेल्वे रुळाच्या चाव्या (फिश प्लेट) गायब झाल्याने कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे २२ डबे घसरल्याची घटना शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व रात्रीला ही घटना घडल्याने हा घातपात तर नाही ना, या दिशेने रेल्वे अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. दोन दिवसांनंतरही हा मार्ग पूर्ववत झालेला नाही. सोमवारी भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत, हे विशेष.
बल्लारशा येथून अमरावती जिल्ह्यातील नवीन एमआयडीसी येथील सोफिया औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात मालगाडीने कोळसा जात होता. मालगाडीचे एकूण २९ डबे होते. मात्र, वलगाव ओलांडताच शिराळा येथे अचानक मालगाडीचे २२ डबे रुळाखालून घसरले. नरखेड रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा आणला गेला. सोमवारी रेल्वे रूळाचे काम आणि अपघातग्रस्त मालगाडीचे डबे उचलण्यात आले होते. नरखेड मार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याने नरखेड- काचीगुडा एक्स्प्रेस, जयपूर ते सिकंदराबाद एक्स्प्रेस या रेल्वे दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. रेल्वे मार्गाचे काम पूर्ववत होण्यासाठी दोन दिवसांपेक्षा अधिक अवधी लागणार आहे. घटनास्थळी भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे प्रबंधक एस.एस.केडिया, अतिरिक्त प्रबंधक मनोज सिन्हा, सहायक वाणिज्य प्रबंधक अनिल बागडे यांच्यासह अमरावती, बडनेरा, अकोला येथील रेल्वे अधिकारी पाेहोचले आहेत.
बॉक्स
रेल्वे सुरक्षा बलाचे सुरक्षेकडे दुर्लक्ष
अमरावती- नरखेड रेल्वे मार्गावर सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाने नियमित गस्त करणे अनिवार्य आहे. मात्र, मोठ्या अंतरापर्यंत रेल्वे रुळाच्या चाव्या गायब होत असताना ते सुरक्षा बलाच्या जवानांना दिसू नये, याचे आश्चर्य आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची गस्त कागदोपत्री असल्याचे चित्र आहे. रुळाच्या तपासणीची जबाबदारी असलेल्या गँगमनलादेखील चाव्या गायब झाल्याचे दिसून आल्या नाहीत. परिणामी रेल्वे प्रशासनाने नरखेड मार्ग वाऱ्यावर सोडून प्रवाशांच्या जीविताशी खेळ चालविल्याचे दिसून येते.