मेळघाटातील वास्तव : स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ लोकमत न्यूज नेटवर्क चिखलदरा : स्वातंत्र्याने सत्तरी गाठली असताना सुद्धा तालुक्यातील अतिदुर्गम हातरू पट्ट्यातील २२ आदिवासी खेड्यांमध्ये आजही वीज पोहोचली नसल्याने येथील ग्रामस्थ अंधारात जीवन जगत आहेत. विद्युत वितरण कंपनीद्वारे मंजूर कामे करण्यात देखील टाळाटाळ होत असल्याने स्थिती अधिकच विदारक झाली आहे. अखेरीस पंचायत समिती उपसभापतींनी या कामांसाठी दहा दिवसांचा अल्टिमेटम वीज कंपनीला दिला असून कामे सुरू न झाल्यास शेकडो आदिवासींसह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तालुक्यातील माखला, सरोवरखेडा, कुही, डोमी, मारिता सलिता, खुटीदा, एकताई, लाखेवाडा बोटू, टेंब्रू, पिपल्या, बोरदा, चुनखडी, बिच्चूखेडा, नवलगाव, खडिमल, माडीझडप, रायपूर, बोराट्याखेडा, रेहट्याखेडा याकिमान २२ आदिवासी खेड्यांमध्ये आजही अंधार आहे. पिढ्यान्पिढ्या आदिवासींच्या नशिबी हा अंधार आला आहे. सन १९९९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हातरू येथे येऊन गेले. त्यावेळी एक दिवस हातरू लखाखले. ते जाताच येथे पुन्हा अंधार झाला. त्यानंतर वीज आली ती तब्बल दहा वर्षांनी. मात्र उपरोक्त २२ खेड्यांचं नशिब अजूनपर्यंत तरी पालटले नाही. येथील आदिवासी अद्यापही अंधारातच चाचपडत आहेत. पालकमंत्र्यांवर भिस्त मेळघाट विकासावर पालकमंत्री प्रवीण पोटे यांचा सर्वाधिक भर आहे. कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण हातरू, जारिदा, काटकुंभ, चुरणी याच पट्ट्यात सर्वाधिक असते. यापरिसरातील रस्ते, पूल, रपटे मूसळधार पावसात वाहून जातात. रस्त्यांची कामे पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत होणार आहेत. त्याचवेळी येथील २२ खेड्यांची अंधारयात्रा प्रकाशमय करण्याची मागणी पालकमंत्र्याकडे करण्यात आली आहे. आता पालकमंत्र्यावरच भिस्त असून त्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. आंदोलनाचा इशारा वीज कंपनीच्या बेजबाबदार व आदिवासी विकास विरोधी धोरणाचा निषेध करीत चिखलदरा पंसचे उपसभापती नानकराम ठाकरे यांनी अचलपूर येथील विद्युत जोडणीची नवीन कामे दहा दिवसांत सुरू करण्याची मागणी केली असून तसे न झाल्यास आदिवासींसह आंदोलनाचा इशारा दिला आहे.
२२ खेड्यात अंधारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2017 12:34 AM