लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : अकोटवरून धारणीकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स हाय पॉइंट ते राजदेवबाबानजीक शंभर फूट खोल दरीत कोसळली. मंगळवारी सकाळी ११:३० वाजता ही घटना घडली. या अपघातात एकूण ३५ प्रवाशांपैकी तीन गंभीर, तर २२ जखमी झाले आहेत. जखमींना १०८ रुग्णवाहिकेने टेम्ब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी चिखलदरा पोलिस रवाना झाले होते.
अपघातात राजू रतन धुर्वे (३५, रा. बैरागड, ता. धारणी), शबाना बी. युनूस (५५, रा. खरगौन, मध्य प्रदेश), अनिल कासदेकर (३६, रा. कुसुमकोट, ता. धारणी) हे गंभीर जखमी झाले. महाज उईके (४४, रा. कासमारखेडा), कुणाल मावसकर (१५, रा. केलपाणी), रेणुका जामूनकर (१९, रा. दहेंडा), नर्मदा तुलसीराम जावरकर, काली तुलसीराम जावरकर (३०, रा. खिडकी), महाजन जांभेकर (३२), कालू रतन जांभेकर (३२) अशी किरकोळ जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर डॉ. चंदन पिंपळकर, डॉ. राहुल तलवारे यांनी उपचार केले. त्यांना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी चालक देविदास येवले, परिचारिका संगीता कासदेकर, कमला धांडेकर, मंगला घुटे आदी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. घटनेची माहिती मिळताच मुंबईहून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी तत्काळ आरोग्य व पोलिस प्रशासनाला मदत करण्याचे सुचविले. मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेसुद्धा या अतिदुर्गम भागात मदतीसाठी पोहोचले होते.
अतिदुर्गम मार्ग अन् भरधाव वाहनअकोट ते धारणी रस्त्याला ढाकणा व तारुबांदा मार्गे हरिसाल असे दोन मार्ग आहेत. मंगळवारी सकाळी राजदेवबाबा बीटमधील कम्पार्टमेंट नंबर ९५३ नजीक अकोटवरून धारणी जाणारी खासगी ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन कोसळली. या मार्गावर ये-जा करण्यासाठी फारशी वाहने नसल्याने मोठ्या प्रमाणात खासगी वाहनात कोंबून व क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेले जातात. अनेकदा अपघात होऊनही प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष असते.
अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारार्थ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.- डॉ. चंदन पिंपळकर, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी.