अमरावती : कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. जिल्ह्यात कोराेनाग्रस्त आणि संक्रमित रुग्ण संख्या दरदिवशी वाढत आहे. शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील १८, तर नागपूरचे तीन, वर्धा येथील एक असे एकूण २२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ६५२ संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत.
एप्रिल महिन्यात कोरोना संक्रमण व मृत्यूचे प्रमाण वाढीस लागले आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांना उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले. त्यानंतर सुपर स्पेशालिटी, पीडीएमसी येथे रुग्णसेवेचा प्रचंड ताण वाढला आहे. शुक्रवारी ६५२ संक्रमित आढळून आले असून, आतापर्यंत ५९,७७६ रुग्ण संक्रमित झाल्याची नोंद आहे. १,७७७ रुग्ण उपचार घेत आहेत. ५२२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, ही संख्या ५२,६७५ झालेली आहे. गृहविलगीकरणात महापालिका क्षेत्रात १,१९८ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत १२,४०३ रुग्णांनी गृहविलगीकरणात उपचार घेतला. ग्रामीण भागात ३,२७९ रुग्ण गृहविलगीकरणात असून, आतापर्यंत १२,४०३ रुग्णांनी उपचार घेतला आहे. ॲक्टिव्ह रुग्ण ६,२५४ एवढे आहेत. रिकव्हरी रेट ८८.१२ टक्के, डेथ रेट १.४२ टक्के, तर डबलिंग रेट ११४ दिवसांवर आला आहे.