शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाईलचा आधार ग्रामीण भागात सर्वाधिक समस्या
अमरावती : कोरोनामुळे सध्या शाळा- महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. परंतु, ऑनलाइन शिक्षणावर भर देताना जिल्ह्यातील किती शाळांमध्ये इंटरनेट, वीज नाही, याचा शासन विचार करीत नाही. जिल्ह्यातील शाळांचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील एकूण २,८८५ शाळांपैकी २,२२९ शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे २,६७९ शाळांत वीजजोडणी असल्याचे शिक्षण विभागाकडून उपलब्ध माहितीत नमूद आहे. मेळघाटातील ८३ शाळांत वीज नाही अन् इंटरनेटही नाही. त्यामुळे अनेक शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ मोबाईलच्या आधारेच ऑनलाइन शिक्षण देत आहेत. आरटीई कायद्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इंटरनेट वीज असणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकास करायचा असेल तर शाळांमध्ये इंटरनेट हवेच. परंतु, शासनाच्या शिक्षण विषयक उदासीन धोरणामुळे अनेक शाळा विजेच्या कनेक्शन व इंटरनेटपासून लांब आहेत. शाळेतील शैक्षणिक कामे विद्यार्थ्याचे परीक्षा अर्ज, आधार लिंकिंग आदींचा शाळा संबंधी कामासाठी इंटरनेटची गरज भासते. परंतु, या शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकांना बाहेरील इंटरनेट कॅफेवर जाऊन ही कामे करावी लागत आहेत. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील १४ पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या २,२२९ शाळांत वीज असली तरी इंटरनेटची सुविधा नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण शाळा - २८८५
जिल्ह्यातील शासकीय शाळा -३३
जिल्ह्यातील अनुदानित शाळा-७३८
विनाअनुदानित शाळा -३७१
बॉक्स
जिल्ह्यातील ८३ शाळांमध्ये वीज नाही
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ८३ शाळांमध्ये वीजच नाही. त्यामुळे या शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा असण्याचा प्रश्नच येत नाही. जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात ८, अमरावती ४, मनपा १, भातकुली ३, चांदूर बाजार ५, चांदूर रेल्वे १, चिखलदरा ३४ , दर्यापूर ९,धामनगाव रेल्वे १,धारणी १६, नांदगाव खंडेश्र्वर १ अशा ८३ शाळांमध्ये विजेची जोडणी नाही. तर अनेक शाळांमध्ये जोडणे असून वीजपुरवठा मात्र खंडित केलेला आहे.
बॉक्स
ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय असते रे भाऊ
कोट
आमच्या शाळेत इंटरनेट सुविधा आहे. कम्प्युटर आहेत. परंतु, सध्या शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मोबाईलवरूनच शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. बऱ्याचदा इंटरनेट नेटवर्क अडचणी येतात. शिक्षक शिकवीत आहेत.
- देवांश्री रवींद्र बागडे,
विद्यार्थीनी
कोट
आमच्या शाळेतील इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षक मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन वर्ग घेतात. ऑनलाइन शिक्षण घेताना अनेक अडचणी सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने प्राथमिक शाळा सुरू कराव्यात.
- जय रेहपांडे,
विद्यार्थी
बॉक्स
शिक्षकांना मोबाईलचा आधार
कोट
जिल्हा परिषदेच्या कोणत्याही शाळेला इंटरनेट कनेक्शन उपलब्ध नाही. शिक्षकांच्या स्वत:च्या वैयक्तिक रिचार्ज वरच ऑनलाइन शिक्षणाचा सर्व डोलारा सुरू आहे. बरेचदा विद्यार्थ्याच्या पालकांच्या मोबाईलचे रिचार्जसुद्धा शिक्षकांना करून द्यावे लागत आहे. परंतु विद्यार्थी शिकला पाहिजे, या एकाच तळमळीने शिक्षक ही जबाबदारी पार पाडत आहे.
- किरण पाटील,
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोखड.
कोट
शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. बऱ्याच पालकांकडे स्मार्टफोन नाहीत. विद्यार्थ्यांनासुद्धा ऑनलाइन शिक्षण मिळत नाही. विशेष म्हणजे विजेची देयकेही भरण्याची सोय नाही. त्यामुळे पालक आता शाळा सुरू करण्याची मागणी करीत आहेत.
- राजेश सावरकर,
मुख्याअध्यापक, जि.प.शाळा शिवणी खुर्द
बॉक्स
शिक्षणाधिकारी म्हणतात
जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही कनेक्शन नाही. त्यामुळे अडचणी येतात. शासनाकडून पुरेसा निधी मिळत नाही. अनेकदा वीजबिल थकीतमुळे शाळांचे वीज कनेक्शन कापण्यात येते. स्मार्टफोनच्या आधारे शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात.
- एजाज खान, प्राथमिक शिक्षणाधिकारी