जितेंद्र दखने, अमरावती : शासनाचे महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन मध्ये प्रस्तावित केलेल्या जिल्ह्यातील २२८ गावे जलयुक्त शिवाय योजनेतून पाणीदार होणार आहेत. नुकतीच संबंधित गावांना जिल्हास्तरीय समितीने हिरवी झेंडी दिली. त्यामुळे वरिष्ठस्तरावरून अंतिम मान्यता मिळताच गावनिहाय गरजेनुसार कामेही ठरविली जाणार आहेत.
जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन राबविण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयाने शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा जलआराखडा तयार करून हे काम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जलयुक्त शिवार अभियान टप्पा-२ राबविण्यासाठी तालुक्यातील सर्व विभागांच्या समन्वयाने शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा जलआराखडा तयार करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित गावामध्ये मृदा आणि जलसंधारणची कामे करण्यात येणार आहे. शिवारफेरी, जलसाक्षरता, लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करण्यासाठी तालुकानिहाय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
तालुकास्तरावर कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय अभियंता (पाणीपुरवठा व जलसंपदा) उपविभागीय जलसंधारण अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण आदींची तालुका समिती राहणार आहे. ही समिती स्थापन करून जलयुक्त शिवार टप्पा-२ अभियानाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये गावपातळीवर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक गाव आराखडा तयार केला जाणार आहे. जलयुक्त शिवार योजनेत २२८ निवड केलेल्या गावाचा प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे पाठविण्यात आला आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार योजना राबविली जाणार आहे.
तालुकानिहाय प्रस्तावित गावांची संख्या
मोर्शी १७, वरूड १७, धारणी १७, चिखलदरा १७, चांदूर बाजार १७, अचलपूर १७, दर्यापूर १२, अंजनगाव सुजी १७, भातकुली १२, नांदगाव खंडेश्वर १७, चांदूर रेल्वे १७, धामणगाव रेल्वे १७, तिवसा १७, अमरावती १७ या प्रमाणे २२८ गावे जिल्हास्तरीय समितीने प्रस्तावित केलेली आहेत.जलयुक्त शिवाय योजनेच्या टप्पा-२ मध्ये २२८ गावे प्रस्तावित केलेली आहे. याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मान्यतेसाठी सादर केला आहे. याला मान्यता मिळताच वरिष्ठाच्या मार्गदर्शनाने समन्वयातून विविध कामे केली जाणार आहेत. - दिलीप निपाणे, कार्यकारी अभियंता, जलसंधारण विभाग.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"