प्रदिप भाकरे,अमरावती: दुचाकीने आलेल्या अज्ञात तिघांनी मारहाण करून कारमधील २३ लाख रुपयांची रोकड लांबविल्याची तक्रार येवदा पोलिसांत नोंदविली गेली होती. स्थानिक गुन्हे शाखेने त्या खळबळजनक घटनेचा अवघ्या १२ तासात उलगडा करत तिनही आरोपींना अटक केली. आरोपींकडून रोख रक्कम व गु्न्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. चालक आणि व्यवस्थापकानेच लुटीचा तो कट रचल्याचे उघड झाले.
सौरभ मनोज साहु (२३, रा. चंदनदास बगीचा मसानगंज, अमरावती), श्रीजीत मुरलीलाल साहु (३१, रा. पटवाचौक,अमरावती) व प्रमोद नामदेवराव ढोके (४२, रा. विलासनगर, अमरावती) अशी अटक आरोपींची नावे आहेत. २६ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ३ च्या सुमारास दर्यापूर ते अकोला रोडवरील लासूर पॉवर हाऊसजवळ सौरभ साहू व प्रमोद ढोके यांना मारहाण करून अज्ञात तिघांनी २३ लाख ५ हजार ४८० रुपये व त्यांचे मोबाईल हिसकावून पळ काढला, अशी तक्रार अमरावती येथील दर्शित अग्रवाल यांनी येवदा पोलिसांत नोंदविली होती. त्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने पिडितांचीच उलट तपासणी करत गुन्हयाचा यशस्वी उलगडा केला. सौरभ व प्रमोद या दोघे कारने तर श्रीजीत हा मोपेडने गेला होता. जबरी चोरीचा बनाव करत लुटलेली रक्कम घेऊन तो अमरावतीत पोहोचला.
ती होती पगडीची रक्कम :
फिर्यादी दर्शित हनुमान अग्रवाल (रा. मोरबाग हाउस, अमरावती) यांनी २६ रोजी त्यांचा चालक प्रमोद ढोके व्यवस्थापक साैरभ साहु यांना अकोला येथे एका कारने नदीम कादर (रा. कोठडी बाजार अकोला’ यांच्याकडून २३ लाख ५ हजार ४८० रुपये पगडी रक्कम आणण्यासाठी पाठविले होते. ती रक्कम घेऊन परत येत असताना लासुर गावासमोर तीन अज्ञातांनी कारला मोपेड गाडीने ठोस मारली. साहू व ढोके यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच त्यांचेकडील मोबाईल व पैशाची थैली जबरदस्तीने हिसकावून घेऊन ते पळून गेले, अशी तक्रार येवदा पोलिसांत नोंदविली गेली होती.
पोलिसांनी हेरली कथनातील तफावत :
एलसीबीने फिर्यादी दर्शित अग्रवाल यांच्याकडून गुन्हयाची पार्श्वभूमी समजून घेतली. तथा गुन्हयातील पिडीत सौरभ साहु व चालक प्रमोद ढोके यांना विचारपूस केली. दोघांचेही कथनामध्ये तफावत दिसून आल्याने एलसीबीने सौरभ साहु याला पुन्हा विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. पैशाची गरज असल्याने आपण श्रीजीत साहू आणि प्रमोद ढोके यांचेसोबत कट रचून गुन्हा केल्याची कबूली सौरभ साहू याने दिली. ती सर्व रक्कम श्रीजीत साहू याने सोबत नेल्याचे सांगितले. त्यावरून श्रीजीत याला ताब्यात घेवून त्याच्या घरातून २३ लाख ५ हजार ४८० रुपये व मोपेड जप्त करण्यात आली.
यांनी केली कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक विकम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात उपनिरिक्षक संजय शिंदे, अंमलदार त्र्यंबक मनोहर, सुनिल महात्मे, शकील चव्हाण, सचिन मिश्रा, सुधिर बावने, सैयद अजमत, निलेश डांगोरे, सागर धापड, रितेश वानखडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.