हरिसाल (अमरावती) : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी हरिसाल येथे मंगळवारी प्रत्यक्ष भेट दिली. दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून ज्या शासकीय निवासस्थानात आत्महत्या केली, तेथे पाहणी केली. त्या निवासस्थानातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गेल्या. सरवदे यांनी तेथे २३ मिनिटे थांबून निरीक्षण नोंदविले.
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरसुद्धा गंभीर आरोप झाले. त्यांच्या चौकशीसाठी मुंबई येथील अप्पर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे या २७ एप्रिल रोजी हरिसाल येथे पोहोचल्या. त्यांनी दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते वनाधिकारी व कर्मचारी यांचे नोंदविलेले बयान त्यावर प्रत्यक्ष बोलून पडताळणी केली. हरिसाल येथे तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील, धारणीचे ठाणेदार कुलकर्णी उपस्थित होते.
बॉक्स
दीपालीची पर्स आणि २३ मिनिटे
दीपाली चव्हाण हरिसाल येथे ज्या शासकीय निवासस्थानात राहत होत्या. त्या शासकीय निवासस्थानी मंगळवारी सकाळी ११.३३ वाजता अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी भेट दिली. शासकीय निवासस्थानातील सर्व खोल्या त्यांनी बघितल्या. दीपालीने जेथे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, त्या ठिकाणाचे बारीक-सारीक निरीक्षण नोंदविले. तेथे पडलेली दीपालीची पर्स उघडून त्यांनी पाहिली. काही कागदपत्रे होती, त्याचीही तपासणी केली. उपस्थित कर्मचाऱ्यांकडून कुलूप उघडायला लावून त्या खोलीची पाहणी केली. ११.५६ च्या सुमारास त्या बाहेर पडल्या.
बॉक्स
कार्यालय जाणे टाळले, अधिकाऱ्यांना ‘नो एंट्री’
एकसदस्यीय समितीच्या प्रमुख असलेल्या पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी हरिसाल येथे भेट देताना पोलिसांसह व्याघ्र प्रकल्पाचा मोठा ताफा तैनात होता. गुगामल वन्यजीव विभागाचे प्रभारी उपवनसंरक्षक अविनाश कुमार, मेळघाट वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी, परीविक्षाधीन उपवनसंरक्षक बबन जोसफ हे आयएफएस अधिकारीसुद्धा तैनात होते. मात्र, आत कुणालाच एन्ट्री नव्हती. दीपाली चव्हाण जेथे कार्यरत होत्या, त्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात जाणे सरवदे यांनी टाळले.