परतवाडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष मोहिमेंतर्गत अचलपूर नगर परिषदेने तीन दिवसांत २३ हजारांचा दंड मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल केला आहे. यात एकूण २९७ लोकांविरुद्ध ही कारवाई केली गेली.
मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या मार्गदर्शनात प्रशासन अधिकारी संजय तळोकार, अंतर्गत लेखापरीक्षक कुंजबिहारी मिश्रा, कार्यालयीन अधीक्षक अमोल दहीकर यांच्यासह नगर परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शहरातील मुख्य मार्गावर, चौकांमध्ये उभे राहून ही कारवाई केली. २६ नोव्हेंबरला १६३ जणांविरुद्ध कारवाई करीत १३ हजार १०० रुपये, २७ नोव्हेंबरला ७३ जणांविरुद्ध कारवाई करीत ५ हजार ८०० रुपये, तर २८ नोव्हेंबरला ६१ लोकांविरुद्ध कारवाई करीत ४ हजार १०० रुपये मिळून एकूण २३ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरात मास्क न घालणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात बाजार ओळीत गर्दीही होत आहे. मात्र, नगरपालिकेच्या या तीन दिवसांतील कारवाईने सकारात्मक बदल बघायला मिळत आहेत.