२.३९ कोटींचे अनधिकृत खत प्रकरण; व्याप्ती वाढली, जबलपूरातही ६८४ बॅग खत जप्त
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: August 22, 2023 05:54 PM2023-08-22T17:54:10+5:302023-08-22T17:54:55+5:30
खत कंपनी एमपीत, कारभार तेलंगणातून
अमरावती : माहूली जहागीर येथील गोदामात सापडलेल्या बोगस रासायनिक खत प्रकरणाची व्याप्ती वाढतच आहे. चौकशीसाठी गेलेल्या येथील पोलिस पथकाला महाराष्ट्र व मध्य प्रदेशात मान्यता नसलेला रासायनिक खताचा साठा कंपनीच्या गोदामात सापडला आहे. प्रत्येकी ४० किलोच्या अशा ६८४ बॅग जप्त करण्यात आल्या. याबाबत एमपीतील कृषी अधिकाऱ्यांनी सोमवारी तेथील पोलिसात कंपनीविरोधात तक्रार नोंदविली आहे.
माहुलीच्या गोदामात सापडलेल्या २.३९ कोटींच्या रासायनिक खतांच्या अनधिकृत साठ्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चार पथकांचे गठन केले व त्यापैकी एक पथक कंपनीचे उत्पादन असलेल्या मध्य प्रदेशातील जबलपूर येथे तपासणीसाठी सोमवारी रवाना झाले होते. दरम्यान कंपनीची पाहणी व खत उत्पादनासंबंधी चौकशी करतांना येथील कारभार हैद्राबाद व तेलंगणा राज्यातून चालविला जात असल्याचे निदर्शनात आले. कंपनीचे मार्केटींग हेड हैद्राबाद व संचालक तेलंगणाचे रहिवासी असल्याची माहिती समोर आणली आहे.