अमरावती : जिल्ह्यात मान्सूनने उशिरा पुनरागमन केले. दहा दिवसांपासून रिमझिम पाऊस होत असल्याने कोरड्यात पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसाने पिके तरारली आहेत. रविवारपर्यंत सरासरी क्षेत्राच्या ९२ टक्के म्हणजेच ६.२७ लाख हेक्टर क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत.
पावसाने दडी मारल्यानंतर पुन्हा ६ जुलैपासून पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यात १५ तारखेपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येत असल्याने शिवारांमध्ये पेरण्यांची लगबग वाढली आहे. सद्य:स्थितीत सोयाबीनची २.३९ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या १३० टक्के पाऊस झालेला असला, तरी १ जूनपासून मात्र २५ टक्के तूट आहे.
‘महावेध’च्या अहवालानुसार, जिल्ह्यात आतापर्यंत २९८ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २०९ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही टक्केवारी ७५ असल्याने आतापर्यंत २५ टक्के पावसाची तूट असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागच्या वर्षी याच दिनांकाला ३१९ मिमी पावसाची नोंद झाली होती.
सोयाबीनपेक्षा कपाशीचे जास्त क्षेत्र
यंदा सोयाबीनपेक्षा कपाशीचे क्षेत्र जास्त आहे. सद्य:स्थितीत सोयाबीनची २,३८,३१८ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. त्या तुलनेत कपाशीची लागवड २,४९,९५३ हेक्टरवर आहे. याशिवाय तूर १०३१०१ हेक्टर, धान ४९४२ हेक्टर, ज्वारी ९१६० हेक्टर, मका १८७४५ हेक्टर, मूग ७३४, उडीद २५६, भुईमूग २२३, तीळ ३३ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.