अमरावती : ग्रामीण भागातील गावे वाड्या वस्त्यांना कृषी वाहिन्यांच्या नव्या निकषानुसार २४ तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे. अकृषिक वीज हानी ४५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर अखंडित वीजपुरवठा केला जाणार असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. राज्यभरातील विविध गावे, वाड्या-वस्त्यांना कृषी वाहिनीच्या विलिकरणातून स्पेशल डिझाईन वितरण रोहीत्र तसेच सिंगल फेजिंगच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. या कृषी वाहिन्यांवरुन शेतीपंपांना दिवसा आठ तास आणि रात्री १० तास असा फेरबदलाने वीज पुरवठा करण्यात येत आहे. या वाहिन्यांवरील कृषिपंप तसेच गावे, वाड्या-वस्त्यांच्या अकृषिक वसुलीच्या एकत्रित हानीनुसार सहा तासापर्यंत भारनियमन केले जात होते. ग्रामीण भागात वीज हानीच्या अ ते फ गटानुसार भारनियमन करण्यासाठी कृषीऐवजी केवळ अकृषिक वसुली हानीचा निकष लावण्यात येणार आहे. या गावांमध्ये अकृषिक हानी ४५ तासांपेक्षा कमी असेल तर २४ तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे. अकृषिक वीजहानी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर नियमानुसार त्या गटात वेळापत्रकानुसार भारनियमन केले जाणार आहे. तसेच कृषिपंपांना सद्यस्थितीत होणारा वीज पुरवठ्याचा कालावधी यापुढे मात्र कायम राहणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्याने यावेळी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
ग्रामीण भागात २४ तास वीजपुरवठा
By admin | Published: June 29, 2014 11:42 PM