गणेश वासनिक,अमरावती:मध्य रेल्वे मुंबई विभागाने ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत तब्बल २४८.०७ कोटी उत्पन्न भंगार विक्रीतून मिळवले आहे. कमाल ३०० कोटी ठरवलेल्या विक्री उद्दिष्टाच्या तुलनेत हे उत्पन्न तब्बल ८२.६९ टक्के इतके उल्लेखनीय असून सदर बाब १८५ कोटींच्या आनुपातिक उद्दिष्टाच्या तुलनेने ३४.०८ टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. भंगार विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात मुंबई मध्य रेल्वे अव्वल स्थानावर असून, नोव्हेंबर २०२३ पर्यंत मध्य रेल्वेच्या सर्व विभागात टक्केवारीत सर्वाधिक वाढ झालेली आहे. ‘शून्य भंगार’ उपक्रमास गती मिळाली आहे.
विशिष्ट विक्री लक्ष्यापेक्षा भंगार विक्रीत नोव्हेंबर -२०२३ पर्यंतच्या कालावधीत, तब्बल ३४.०९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भंगारातून उत्पन्न मिळवण्याच्या मध्य रेल्वेच्या दृढ प्रयत्नांना प्रभावी यश मिळाले आहे. मध्य रेल्वेच्या सर्व विभागांत भंगार विक्रीत सर्वाधिक टक्के वाढ मिळवून ते अव्वल स्थानावर आहेत. मध्य रेल्वेने वयोमर्यादा पूर्ण झालेली रेल्वे इंजिन्स, अतिरिक्त डिझेल इंजिन्स, वापरात नसलेले रेल्वे रूळ आणि वयोमर्यादा पूर्ण झालेली अपघाती इंजिन्स / रेल्वे डब्बे यासह विविध प्रकारचे भंगार वर्गीकरण आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यामुळे त्या भंगाराचे उत्पन्नात रूपांतर झाले आहे. प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड विहित वेळेत भंगार साहित्यापासून पूर्णपणे मुक्त करणे हा या उपक्रमाचा भाग आहे. १३ लोकोमोटिव्ह, २१६ डबे आणि १२४ वॅगन्स विक्रीमध्ये समावेश आहे.
मध्य रेल्वे विभागात नोव्हेंबर २०२३ पर्यंत झालेली भंगार विक्री :
भुसावळ विभाग: ७,९९४ दशलक्ष टन
मुंबई विभाग: ४,१४४ दशलक्ष टन
नागपूर विभाग : ३,७४८ दशलक्ष टन
सोलापूर :१,२८० दशलक्ष टन,
पुणे विभाग: १,०६३ दशलक्ष टन
चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत मिळालेले उत्पन्न :
भुसावळ विभाग: ४९.२० कोटी, माटुंगा आगार: ४०.५८ कोटी, मुंबई विभाग: ३६.३९ कोटी, भुसावळच्या इलेक्ट्रिक लोको शेड: २३.६७ कोटी, नागपूर विभाग: २२.३२ कोटी, पुणे विभाग: २२.३१ कोटी, सोलापूर विभाग : २०.७० कोटी, तसेच परळ, हाजी बंदर-शिवडी, मनमाड व करी रोड एकत्रितपणे ३२.९० कोटी.