पान २ ची लिड
मोर्शी : शहरासह तालुक्यात एकूण २५ कोरोननाग्रस्तांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागातही धुडगूस घातला आहे. तूर्तास ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या ६४४ व शहरातील कोरोना पॉझिटिव्ह संख्या ७२४ अशी असून, तालुक्यात एकूण कोरोना पॉझिटिव्हची संख्या १३६८ वर पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या संख्येत संसर्ग असताना, अद्यापही मोर्शी येथे कोविड रुग्णालय उभारले गेले नाही किंवा खासगी डॉक्टरलादेखील कोविड रुग्णालयाची परवानगी देण्यात आली नाही.
तालुका आरोग्य कार्यालयानुसार, ग्रामीण भागातील ५१५ व शहरातील ६०० असे एकूण १११५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या ग्रामीण भागात १२० व शहरी भागातील १०८ रुग्ण असे एकूण तालुक्यात २२८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ग्रामीण भागातील नऊ व शहरातील १६ रुग्ण कोरोनाने मृत्युमुखी पडले. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली असून, रुग्ण मृत्युमुखी पडत असल्याने मोर्शी शहर व तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लॉकडाऊन नावालाच
शासनाच्यावतीने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले असले तरी मोर्शी शहरात काही ना काही कामानिमित्त ग्रामीण भागातील नागरिकांची नेहमीच वर्दळ आहे. जयस्तंभ चौक येथे अकारण फिरणाऱ्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आली. यात अर्ध्या तासांत दहा जण पॉझिटिव्ह निघाले. तेच शहरात, बाजारपेठेत फिरताना दिसतात. नगर परिषद व पोलीस प्रशासन जरी याकडे लक्ष ठेवून असले तरी जनता जनार्दन मात्र कोरोना या रोगाची गंभीरता घेत नसल्याचे चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
एकाच बोळीतून झुंबड
जयस्तंभ चौक व गांधी मार्केटकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला असला तरी शहरातील अत्यावश्यक व्यावसायिकांना सकाळी ७ ते ११ दरम्यान आपली प्रतिष्ठाने उघडी ठेवण्याची मुभा दिली असल्याने मार्केटमध्ये जाण्यासाठी एकाच बोळीतून नागरिकांची झुंबड होत असून, येथूनच दुचाकी व चारचाकी वाहनेसुद्धा जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता बळावली आहे.
धुरळणी, फवारणी नावालाच
शहरात सध्या कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात असतानासुद्धा नगर परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या फवारणी, धुवारणीच्या मोहिमेला सध्या ब्रेक लागला आहे. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाला सुरुवात झाली होती. त्यावेळी एखाद्या भागात कोरोना रुग्ण आढळला की, संपूर्ण फवारणी करून परिसर सॅनिटाइज करण्यात येत होता. पहिल्या लाटेच्या दरम्यान झालेली कोरोनाची रुग्णवाढ लक्षात घेता, शहरात मोठ्या प्रमाणात फवारणी करण्यासाठी नगर परिषदेने फवारणी वाहनांचीदेखील व्यवस्था केली होती. मात्र, पहिला लाटेच्या तुलनेत आता पालिकेच्या स्वच्छता विभागाला त्याचा विसर पडला आहे.
----------------