गणेश वासनिक
अमरावती : मनुष्य जंगलाकडे तर वन्यजीव नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहे. परिणामी मानव- वन्यजीव संघर्षाचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: विदर्भात मानव- वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला असून, एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात २५ जणांना लक्ष्य करण्यात आले आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने वन विभागाने चिंता व्यक्त केली आहे.
विदर्भातीलवाघांच्या भ्रमंती मार्गाचे कॉरिडॉर बदलत आहे. ताडोबा- अंधारी, मध्य चांदा येथील वाघ यवतमाळ जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे. तर यवतमाळच्या टिपेश्वर येथील वाघ किनवटच्या जंगलाकडे धाव घेत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघ, बिबट हे सातपुडा पर्वत रांगेतून काटेपूर्णा, अकाेला, वाशिमपर्यंत स्थिरावत आहेत. पांढरकवडा, अमरावती वन विभागातील वाघांनी नवे संचार मार्ग शोधले आहे. गडचिरोली भंडारा, गोंदियातील वाघ हे नागपूर, काटोल, कळमेश्वरच्या जंगलात येत आहे. संचार क्षेत्र आणि भक्ष्य कमी पडत असल्याने वन्यजीव दुसरीकडे धाव घेत आहे. वाघ, बिबट्याच्या भ्रमंतीमुळेच मानव- वन्यजीव संघर्ष वाढला आहे. त्यामुळे वन खात्याने यवतमाळ, नागपूर येथे नव्याने रेस्क्यू पथक स्थापन केले आहे.
येथेही मानवाला मृत्यू ओढवले
- ताडोबा येथील टी-१ नामक वाघाने २०२० मध्ये अमरावतीच्या मंगरुळ दस्तगीर येथील एका शेतकऱ्याला ठार केले होते.
- यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्यात येथे २०१९ मध्ये अवनी नामक वाघिणीने १३ जणांना ठार केले होते.
- बुलडाणा जिल्ह्यात वाघ, अस्वलीच्या हल्ल्यात तीन जणांना मृत्यू ओढवला.
- भंडारा, गोंदिया, गडचिरोलीतही मनुष्यावर वन्यजीवांचे हल्ले निरंतर सुरू आहे
चंद्रपूर जिल्ह्यात पोस्टींग नको?
चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक वनसंपदा आहे. चंद्रपूर ही वन विभागाची काशी मानली जाते. येथे नव्या आयएफएस अधिकाऱ्याना बरेच काही शिकता येते. मात्र, मानव- वन्यजीव संघर्ष वाढत असल्याने येथे वन अधिकारी नियुक्ती होऊ नये, यासाठी लॉबिंग करतात. वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांनी चंद्रपूर, गङचिरोली जागत आहे.
मानव-वन्यजीव संघर्ष कमी व्हावा आणि जंगलालगतच्या नागरी वस्त्यांमध्ये सुरक्षितता प्रदान करण्याच्या अनुषंगाने अमरावतीत १० मे रोजी राज्यातील वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यात मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात आला. रेस्क्यू पथकही गठित केले आहे.
- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र