महाप्रसादाचे वितरण : बेसखेडा येथे चंद्रपुरी महाराजांची पुण्यतिथीचांदूरबाजार : तिसऱ्या श्रावण सोमवारी बेसखेडा येथे चंद्रपुरी बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित महाप्रसादात २५ हजारांवर भाविकांनी दोडक्याची भाजी व रोडग्याचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतीही बालिका, महिला व वयोवृद्ध महिलांचा सहभाग नव्हता. अवघे २२ वर्षे असलेल्या बालब्रह्मचारी चंद्रपुरी महाराज यांनी बेसखेडा परिसरात कॉलरा साथीच्या रोगाने होणारे असंख्य मृत्यू रोखण्यासाठी देवापुढे संजीवन समाधी घेण्याचा संकल्प केला होता. गावातील मृत्यूचे तांडव थांबताच संकल्प पूर्ण करून श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी बेसखेड्यातच जिवंत समाधी घेतली. तेव्हापासून दरवर्षी श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी या गावात दोडक्याची भाजी व रोडग्यांचा प्रसाद वितरित करण्यात येत आहे. आजही गावातील भाविक व चंद्रपुरी महाराजावर अपार श्रद्धा असलेले नागरिक लोकवर्गणीतून हा सोहळा पार पाडतात. तिसऱ्या श्रावण सोमवारच्या महोत्सव व महाप्रसादाची तयारी गावकरी एक महिना आधी पासूनच करतात. सव्वा पायलीच्या धान्यातून सुरू झालेला हा सोहळा आज २५ क्विंटल धान्यावर गेला आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाही २५ क्विंटलच्यावर धान्य व दोडक्याचे दान या महोत्सवासाठी गोळा झाले. पहाटे महाराजांची पूजाअर्चा करून गावभर महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. आरतीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. संस्थानची कुठलीही मालमत्ता नसतानाही परिसरातील गावकरी तसेच देणगीदारांचे सहकार्याने हा सोहळा साजरा करण्यात येतो. जागा मिळेल तिथे बसून भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. भर पावसातही बसणाऱ्या पंगती आजूबाजूच्या गावातील गावकरी व गावातील कार्यकर्ते कार्यकर्ते यांची एकजूट हे या महोत्सवाचे वैशिष्टे आहे. आ. बच्चू कडू यांनी संपूर्ण परिसरात काँक्रीटीकरण केल्यामुळे पूर्वी चिखलात बसणाऱ्या पंगती आता सुव्यवस्थितपणे बसत आहे. मंदिराची भव्य वास्तू तत्कालीन आ. वसुधा देशमुख यांच्या निधीतून बांधली आहे.
२५ हजार भाविकांनी घेतला दोडक्याच्या भाजीचा आस्वाद
By admin | Published: September 02, 2015 12:12 AM