अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभागीय विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २६२ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. विभागातील पाचही जिल्ह्यात विभागलेल्या या मतदान केंद्रांपैकी सर्वाधिक ७५ मतदान केंद्र अमरावती जिल्ह्यात असून, सर्वात कमी २६ केंद्रे वाशिममध्ये आहेत.
या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादीनुसार विभागात २ लाख ०६ हजार १७२ मतदार आहेत. अमरावती जिल्ह्यात ६४ हजार ३४४, अकोला ५० हजार ६०६, बुलडाण्यात ३७ हजार ८९४, वाशिम १८ हजार ५०, तर यवतमाळ जिल्ह्यात ३५ हजार २७८ मतदारांची नोंदणी झाली आहे. यासाठी विभागात २६२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी नोडल अधिकारी यांच्या नियुक्त्या यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २८८ मतदान केंद्र अध्यक्ष, १ हजार १५३ मतदान अधिकारी आणि २८९ सूक्ष्म निरीक्षकांचा समावेश आहे. मतदानापूर्वीच्या कालावधीत प्रभावीपणे जनजागृती करण्याची प्रशासनाची तयारी आहे. कुणाचेही मतदान बाद होणार नाही. यासाठी आवश्यकता सूचना देण्यात येणार आहेत. याशिवाय आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोविड-१९बाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. मतमोजणीचे प्रशिक्षण, वाहतूक आराखडा, मतमोजणी केंद्र आदी प्रक्रिया सुरू आहेत.
जिल्हानिहाय मतदान केंद्र संख्या
अमरावती जिल्ह्यात ७५, अकोला ६१, बुलढाणा ५२, वाशिम २६ व यवतमाळ जिल्ह्यात ४८ याप्रमाणे मतदान केंद्रे राहणार आहेत.