अमरावती : राज्य शासनाने पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात ४८८ शाळांमध्ये पथदर्शी स्वरूपात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना सुरू केली आहे. यामध्ये जिल्हाभरातील १४ तालुक्यांतील २७ शाळांचा समावेश आहे. या आदर्श शाळांमध्ये भौतिक व शैक्षणिक सर्व सोई सुविधांचा सध्याच्या स्थितीत आढावा घेण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी या शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेण्यासाठी त्रिसदस्य असलेली १६ पथके गठीत केली आहेत. या पथकांमार्फत येत्या १६ ते २७ ऑक्टोबर दरम्यान या शाळांची तपासणी केली जाणार आहे.
राज्य शासनाने पथदर्शी स्वरूपात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना सुरू केली आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रापासून सुरू केली आहे. या उपक्रमात २७ शाळांची निवड केली आहे. या आदर्श शाळा संदर्भात भौतिक व शैक्षणिक सर्व बाबींचा सद्यस्थितीत आढावा घेण्याकरिता प्रत्यक्षात शाळांना भेटी देण्याकरिता शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. याकरिता वेगवेगळे असलेले पर्यवेक्षीय अधिकारी या निवड झालेल्या शाळांना सोमवारपासून प्रत्यक्ष भेटी देऊन शाळेतील सोई-सुविधांची झाडाझडती घेणार आहेत.
या शाळांच्या भेटीनंतर संबंधित पथकास तपासणीबाबत अहवाल सादर करावा लागणार आहे. यासंदर्भात १० ऑक्टोबर रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक आणि डायटचे प्राचार्य यांनी लेखी पत्र काढून संबंधित तपासणी पथकास नेमून दिलेल्या शाळेला भेटी देऊन तपासणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या पथकांमध्ये एकूण ४८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची चमू नेमली आहे.
या शाळांचा आहे समावेश
जि. प. उच्च प्राथमिक शाळा हरम, जि. प. उच्च प्राथमिक शाळा पांढरी, जि. प. उच्च प्राथमिक उर्दू शाळा येवदा, शासकीय विद्यानिकेतन अमरावती, जि. प. उच्च प्राथमिक शाळा बेलोरा, जि. प. उच्च प्राथमिक उर्दू शाळा ब्राम्हणवाडा थडी, जि. प. शाळा प्राथमिक मराठी कन्या शाळा, उर्दू शाळा शिरजगांव कसबा, जि. प. उच्च प्राथमिक उर्दू शाळा देऊरवाडा, जि. प. उच्च उर्दू शाळा शिरजगांव बंड, जि. प. शाळा राजना पूर्णा, जि. प. उच्च प्राथमिक शाळा गांगरखेडा, जि. प. शाळा तोंडगाव, कारंजा बहिरम, तळेगाव मोहना, विश्रोळी,घाटलाडकी, जि. प. शाळा बेनोडा, नेरपिंगळाई, खिडकीकलम, मार्डी, अंजनसिंगी, जळका जगताप, शिवणी रसुलापूर, टाकरखेड संभू, नांदुरा बु. आणि अलम्मा इक्बाल मनपा शाळा क्र. २ आदी शाळांचा समावेश आहे.