अमरावती : महापालिकेत पाचव्या, सहाव्या वेतन आयोगापासून ६७ कर्मचाऱ्यांना अतिप्रदान करण्यात आलेले २७ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासनाच्या धडाकेबाज कार्यवाहीने कर्मचारी हैराण झाले आहे. जानेवारी २०२१पासून वेतन कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेचा आर्थिक डोलारा ढासळला असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना अतिप्रदान वेतन उचल केल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली होती. लेखा आक्षेपानंतर ही बाब पुढे आल्याने लेखा विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अतिप्रदान वेतन घेणाऱ्यांपैकी काही अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्तदेखील झाले आहे. असे असले तर जानेवारी २०२१पासून अतिप्रदान वेतनाची रक्कम वसूल करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने पुढाकार घेतला आहे. याप्रकरणी आयुक्त प्रशांत रोडे यांनी लक्ष दिल्यामुळे ६७ कर्मचाऱ्यांकडून २७ लाख ३४ हजार ९१६ रुपये महापालिका तिजोरीत जमा होणार आहे.
-------------------
‘बाबुगिरी’चे फिक्सिंग
सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीबाबत वरिष्ठांकडे टिपणी पाठविताना ‘बाबुगिरी’कडून फिक्सिंग करण्यात येत असल्याची शंका बळावली आहे. मर्जीतील अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतनाची रक्कम ठरविताना टिपणीत घुसखोरी करून त्यावर आयुक्त, उपायुक्तांनी स्वाक्षरी घेऊन तसा प्रवास केला जातो. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाच्या दुर्लक्षानेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना अतिप्रदान वेतन देण्यात आल्याचे वास्तव आहे.