प्राथमिक शिक्षणाधिकारी सकारात्मक : आज सीईओंना भेटणार
अमरावती : मेळघाटात कार्यरत असलेल्या २७३ शिक्षकांच्या अन्यत्र बदल्यांचा मार्ग सुकर बनण्याचे संकेत आहेत. सोमवारी मेळघाटातील शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांची भेट घेवून २७३ शिक्षकांना बदलीबाबतचे आदेश देण्याची विनंती केली. सन २००३-०४ पासून मेळघाटात कार्यरत असलेल्या तथापि २७३ शिक्षकांना २०१५-१६ च्या बदलीच्या सेवाज्येष्ठता यादीमध्ये समाविष्ट करावे, अशी विनंती विनोद राठोड यांच्यासह लखन जाधव, विष्णू आडे, राहुल ब्राह्मण आदींनी पानझाडे यांच्याकडे केली. या २७३ शिक्षकांपैकी बरेच शिक्षक आंतरजिल्हा बदलीपात्र आहेत. त्या शिक्षकांना आता आतंरजिल्हा बदली करण्यास अडचण निर्माण होणार नाही. प्राथमिक शिक्षणाधिकारी सकारात्मक या २७३ शिक्षकांना यावर्षीच्या बदली प्रक्रियेत सामावून घेऊन अन्य बारा तालुक्यांत कोठेही बदलून जाता येणार आहे, असा दावा विनोद राठोड यांनी केला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनासोबत याचिका क्र. ३२७८/२०१० उच्च न्यायालयाची प्रतही देण्यात आली आहे. या न्यायालयीन याचिकेमुळे बदलीपात्र शिक्षकांचे आदेश देण्यास कोणतीही अडचण नसल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)