लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता ई-केवायसी व आधार लिंकिंग केलेल्या २.७४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे. त्यानंतरचा २० वा हप्ता मात्र कुटुंबातील फक्त एका व्यक्तीलाच मिळणार असल्याची प्रशासनाची माहिती आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी केंद्र शासनाने पीएम किसान योजना डिसेंबर २०२४ पासून सुरू केली. या योजनेत वर्षाला सहा हजार रुपयांची मदत पात्र शेतकऱ्यांना देण्यात येते. यामध्ये वर्षात तीन वेळा प्रत्येकी चार महिन्यांत दोन हजारांचा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो. योजनेचे आतापर्यंत १८ हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. फेब्रुवारी महिन्यात १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची चर्चा प्रशासनात आहे.
योजनेत तालुकानिहाय पात्र लाभार्थी योजनेमध्ये ई-केवायसी व आधार लिकिंग केलेले २,७३,९७१ शेतकरी आहेत. यामध्ये अचलपूर तालुक्यात २२,६२८ शेतकरी, अमरावती १६,२८७, अंजनगाव सुर्जी १९,३३१, भातकुली १६,१४०, चांदूर रेल्वे १३,८८३, चांदूरबाजार २६,५४६, चिखलदरा १०,५६८, दर्यापूर २४,३२०, धामणगाव १८००२, धारणी १६,५७१, मोर्शी २५,१०६, नांदगाव खंडेश्वर २२,७७०, तिवसा १५,२८७ व वरुड तालुक्यात २६,५३० शेतकरी आहेत.