लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शुक्रवार, शनिवारी शहरात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तक्रारींचा ओघ सुरूच असून, विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची संख्या ५० वर पोहोचली आहे. तब्बल १६ हजार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरूवारी सायंकाळपर्यंत अटक आरोपींची संख्या २७८ पार पोहोचली आहे. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता इंटरनेट बंदीचा आढावा घेतला जाणार आहे. यादरम्यान माजी मंत्री जगदीश गुप्ता व निषाद जोध यांना १५ दिवस शहराबाहेर राहण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने बुधवारी सायंकाळी दिले. शहरातील विविध ठिकाणी १३ नोव्हेंबर रोजी उफाळलेल्या हिंसाचार, दगडफेक, नासधूस, लूटपाट व प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी १७ नोव्हेंबर रोजीदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ते रात्रीपर्यंत झालेल्या अनेक घटनांमध्ये १७ नोव्हेंबर रोजी शहर कोतवाली, नागपुरी गेट, खोलापूरी गेट, गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या कालावधीत संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. जातीय सलोखा बळकट करण्याच्या हेतूने शहरातील संवदेनशील भागात पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वात डीसीपीद्वय विक्रम साळी व एम.एम. मकानदार, सहायक आयुक्त भारत गायकवाड व पूनम पाटील ही मंडळी अहोरात्र कॉर्नर मीटिंग घेऊन एकात्मतेचा जागर करीत आहेत.
प्रक्षोभक वक्तव्यापोटी गुन्हे शहर कोतवाली पोलिसांनी आमदार प्रवीण पोटे, भाजपचे महापालिकेतील गटनेता तुषार भारतीय, माजी मंत्री अनिल बोंडे, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, माजी मंत्री जगदीश गुप्ता व अन्य ५० ते ६० जणांविरुद्ध भादंविचे कलम २९५ अ, १५३, १५३ ब, ५०५ अ, ब, २९८ अन्वये गुन्हे दाखल केले. आमदार प्रवीण पोटे, तुषार भारतीय, एक महिला, शिवराय कुळकर्णी, अनिल बोंडे यांच्याविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी स्वतंत्र असा कलम १४३, १४७, १४८, , १४९, ३५३, ३३३, ३३६, १०७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. शासकीय कामकाजात अडथळा, जिवे मारण्याच्या हेतूने हल्ल्याचा आरोपदेखील त्यांच्यावर ठेवण्यात आला. ठाणेदार नीलिमा आरज यांनी प्रसारित ध्वनीचित्रफितीच्या आधारे ते गुन्हे दाखल केले.
याप्रकरणी आतापर्यंत २५० पेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आली. जातीय सलोखा टिकवून ठेवण्यासाठी, बळकट करण्यासाठी संवेदनशील भागात मोहल्ला कमिटीच्या कॉर्नर मीटिंग घेतल्या जात आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. शहर शांततेकडे वाटचाल करीत आहे. - डॉ. आरती सिंहपोलीस आयुक्त