अमरावती : केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली निवृत्त प्राध्यापकाकडून बँक खात्याची माहिती काढून घेत चक्क २८ लाख रुपये वळते करुन ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे.
अनोळखी व्यक्ती, अनोळखी क्रमांकावरुन आलेला फोन, संदेश पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे आपली माहिती, बँकेच्या डिटेल्स, पासवर्ड इतर कुणाशीही शेअर करू नये. शहरातील एका निवृत्त प्राध्यापकाला केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली एका तोतयाने चक्क २८ लाख रुपयांनी फसवले आहे.
अश्विनीकुमार पंकजराव धांडे(वय ५२, रा. मोहन कॉलनी) असे फसवणूक झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. त्यांचे भारतीय स्टेट बँकेत खाते आहे. त्यांनी आपल्या कार्यावरुन नुकतीच स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्याचे काही पैसे खात्यात जमा झाले होते. दरम्यान २० ऑक्टोबरला त्यांना मोबाईलवर एक संदेश प्राप्त झाला. हा संदेश बँकेतून आल्याचे भासवून केवायसी अपडेट करा, तसे न केल्यास बँकखाते बंद पडण्याची भीती दाखवण्यात आली. सदर संदेशात एक मोबाईल क्रमांकही दिला होता व त्यावर संपर्क करून केवायसी अपडेट करण्याबाबत सांगितले होते.
धांडे यांनी त्या क्रमांकावर संपर्क केला असता संवाद साधणाऱ्याने आपण एसबीआय कर्मचारी असल्याचे सांगितले व धांडे यांच्याकडून इंटरनेच बँकिंग युजर आयडी, पासवर्ड व मोबाईलवर आलेला ओटीपी मागून घेतला. या माहितीच्या आधारे त्या तोतया व्यक्तिला धांडे यांच्या ऑनलाइन बँकिंगचे व्यवहार हाताळण्याचे अधिकार सहज मिळआले. त्याने चार दिवसांत दररोज ७ लाखप्रमाणे २८ लाख १३ हजार रुपये धांडेंच्या बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते केले.
झालेला प्रकार समजताच भांबावलेल्या धांडेंनी पोलिसात तक्रार दाखल केली. शहर सायबर पोलिसांनी तोतया बँक अधिकाऱ्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.