अमरावती : जुलैपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप, अतिवृष्टी यामुळे पश्चिम विदर्भात सरासरीच्या १२१.४ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. हा पाऊस तहानलेल्या प्रकल्पाच्या पथ्यावर पडला आहे. सद्यस्थितीत विभागातील नऊ मुख्य, २७ मध्यम व २७५ लघुप्रकल्पांत ९० टक्के जलसाठा आहे. यामध्ये २८ प्रकल्पात पूर्ण जलसंचय झाल्याने नदी-नाल्यांमध्ये विसर्ग सुरू आहे.
पश्चिम विदर्भात सप्टेंबर महिन्यात अपेक्षित सरासरीच्या २४८.५ टक्के पाऊस झालेला आहे. याशिवाय १ जून ते १३ सप्टेंबरपर्यंत ६७६ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८२१ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये अकोला जिल्हा वगळता अमरावती, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांनी पावसाची सरासरी पार केलेली आहे.
विभागातील मुख्य प्रकल्पांमध्ये ऊर्ध्व वर्धा प्रकल्पांत ९८ टक्के जलसाठा असून सर्वच १३ ही दरवाजे १७० सेंमीने उघडण्यात आलेले आहे. घुस प्रकल्पाचे दरवाजे २३ सेंमी, अरुणावतीचे तीन गेट २० सेंमी, बेंबळा प्रकल्पाचे २० गेट २५ सेंमी, काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन गेट १५ सेंमी, पेनटाकळी प्रकल्पाचे दोन गेट १० सेंमी तर खडकपूर्णाचे तीन गेट ३० सेंमीने उघडण्यात येऊन विसर्ग सुरू आहे. याशिवाय २१ मध्यम प्रकल्पांमधून ही विसर्ग सुरू आहे.
रबीला फायदा, पाणीटंचाईची शक्यता कमी
अमरावती विभागात मार्च महिन्यापर्यंत साधारणपणे ९०० गावांमध्ये पाणीटंचाई असते. यंदा सततच्या पावसामुळे भूजलाचे पुनर्भरण झाल्याने भूजलस्तरात वाढ झालेली आहे. पाण्याच्या स्त्रोतांमध्ये मुबलक साठा आहे. त्यामुळे मे पश्चातच उंच भागावरील काही गावात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. याशिवाय रब्बी पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहणार आहे.
भंडाऱ्यातील १४ मार्ग ठप्प, वैनगंगा फुगली
भंडारा जिल्ह्यात मंगळवारी तिसऱ्या दिवशीही सर्वदूर पाऊस कोसळला. या पावसाने नदी-नाल्यांना पूर आला असून, १४ ग्रामीण रस्ते बंद झाले होते. गत २४ तासांत ७२.८ मिमी. पावसाची नोंद झाली असून, १३ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. रविवारी दुपार पासूनच पावसाला सुरुवात झाली. सोमवारी पहाटे ४.३० पासून सर्वदूर जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, १४ मार्ग बंद पडले आहेत.
वैनगंगेच्या जल पातळीत वाढ झाली. मंगळवारी दुपारी ४ वाजता भंडारालगत कारधा येथे २४३.९४ मीटर पाणीपातळी नोंदविण्यात आली. भंडारा शहरातील सखल भागातील अनेक घरांत पाणी शिरले असून, ग्रामीण भागातील काही घरांची पडझड झाली आहे. सतत पाऊस पडत असल्याने गोसेखुर्द प्रकल्पाच्या जल पातळीत वाढ होत आहे. पाणी नियंत्रणासाठी या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे सोमवार सायंकाळपासून उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातून ६ हजार ९९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. २३ गेट एक मीटरने, तर १० गेट अर्ध्या मीटरने उघडण्यात आली आहेत.
गोंदिया जिल्ह्यात संततधार...
गोंदिया जिल्ह्यात संततधार मंगळवारीही संततधार पावसाने हजेरी लावली. गोंदिया तालुक्यात १००.२३ मिलीमीटर पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली, तर तिरोडा आणि सालेकसा तालुक्यात सुद्धा दमदार पाऊस झाला. अर्जुनी मोरगाव तालुक्यात सोमवारी अतिवृष्टी झाल्याने या तालुक्यातील काही मार्ग मंगळवारी दुसऱ्या दिवशी बंद होते. केशोरी परिसर जलमय झाल्याचे चित्र होते. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यवतमाळात रिमझिम
दोन दिवसांच्या दमदार पावसानंतर मंगळवारी सायंकाळनंतर यवतमाळ शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत रिमझिम पावसाने हजेरी लावली. दरम्यान, मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात १५.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.