अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आंतरजिल्हा ऑनलाईन बदलीने मराठी माध्यमाचे २५५ आणि उर्दूचे ३१ शिक्षक रुजू होणार आहेत, तर पाचही जिल्हा परिषदांमधून मराठीचे १५८ व उर्दूचे ३२ शिक्षक बदलीवर इतरत्र जाणार आहेत. राज्य शासनाने आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली. जिल्हा परिषद स्तरावर शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतही आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात दरवर्षी शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येते. कोविडच्या पार्श्वभूमीवर या बदल्यांबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. राज्य शासनाने १० ऑगस्टपूर्वी सर्व शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन व जिल्हा अंतर्गत बदल्या ऑफलाईन करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार अनेक वर्षापासून स्वत:चे गाव किंवा कुटुंबापासून लांब नोकरी करणा-या शिक्षकांची बदली प्रक्रियेची कार्यवाही सुरू केल्याचे घरवापसीचा मार्ग मोकळा केला.
राज्यभरातील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या जवळपास १२ हजार ४९० शिक्षकांनी स्वजिल्ह्यात बदलीसाठी केलेल्या ऑनलाईन अर्जांची छाननी केल्यानंतर जिल्हास्तरावर इच्छुक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात करून प्राधान्यक्रमानुसार आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यामध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील मराठी माध्यमाचे १५८ शिक्षक बदलीवर जाणार आहेत, तर २५५ शिक्षक विविध जिल्ह्यात रुजू होणार आहेत. याशिवाय उर्दू माध्यम विभागातून ३२ शिक्षक जाणार आहेत, तर ३१ शिक्षक बदलीने रुजू होणार आहेत.
विभागात जिल्हानिहाय येणार व कंसात जाणारे शिक्षक मराठी माध्यम : अमरावती १५ (२६), अकोला १४ (२९), बुलडााणा ५६ (३१), वाशिम ७ (७), यवतमाळ १६३ (६५)उर्दू माध्यम : अमरावती ०४ (०७), अकोला १४ (०२), बुलडाणा ०९ (०७), वाशिम १ (१), यवतमाळ ३ (१५)