लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी तीन आठवड्यांपासून संपवार आहेत. शासनाने भरघोस पगारवाढ दिल्यानंतर अमरावती विभागातील २ हजार ४४१ कर्मचाऱ्यांपैकी २९६ कर्मचारी कामावर परतले. २१५० कर्मचाऱ्यांनी पगारवाढीवर नाखुशी दर्शविली. त्यामुळे अजूनही हे कर्मचारी कामावर परतले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील आठ एसटी आगारातील ६६७ बसेसची चाके थांबलेलीच आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी तीन आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपवार आहेत. सरकारसोबत वारंवार चर्चाही झाली. यामध्ये परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा केली. तसा शासनाने निर्णयही जारी केला. मात्र, जिल्ह्यातील २४४१ एसटी कर्मचाऱ्यांपैकी केवळ २९६ कर्मचाऱ्यांनी पगारवाढ स्वीकारून कामावर रुजू झाले. परिणामी ३६७ बस आगारात असताना केवळ अमरावती आगारातून गुरुवारी अमरावती-वरूड आणि वरूड-अमरावती या दोन एसटी बसच्या फेऱ्या सोडण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. खासगी प्रवासी वाहतुकीला कंटाळलेल्या प्रवाशांनाही एसटीची चाके गतिमान हवी आहेत.
२९६ जणांनी स्वीकारली पगार वाढअमरावती विभागातील २४४१ एसटी कर्मचाऱ्यांपैकी २१५० कर्मचारी एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी संपवार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी शासनाची पगारवाढ नाकारली आहे. कामावर परतलेल्या २९६ कर्मचाऱ्यांपैकी १५ कर्मचारी रीतसर रजेवर आहेत. प्रत्यक्षात २८१ कर्मचारी कामावर आले आहेत. यामध्ये यांत्रिकी, नऊ कार्यालयीन चालक, प्रशासकीय, पर्यक्षकीय आणि अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे एसटी महामंडळाचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खासगी गाड्यांची सवय झाली
एसटी बसेस जवळपास महिना होत आहे. बंद आहेत. त्यामुळे गावखेड्यातून शहरात जायचे झाल्यास नाइलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे सरकारने यावर तोडगा काढून हा प्रश्न सोडवावा.- विलास रेहपांडे, प्रवासी
एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. बस बंद असल्याने खासगी वाहने जादा भाडे आकारून प्रवाशाची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. त्यामुळे बसेस सुरू होणे आवश्यक आहे.- मोहन बैलके,प्रवासी