पहिल्यांदाच उपक्रम : ताण, तणावातून मुक्तीअमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या ३० बंदीजनांनी विपश्यना शिबिरात सहभागी होऊन ताण, तणावातून मुक्तीचे धडे घेतले. हा उपक्रम राज्य शासनाच्या कारागृह प्रशासनाच्या आदेशानुसार घेण्यात आला आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहात पहिल्यांदाच विपश्यना शिबिर पार पडले.कारागृह हे बंदीजनांसाठी ‘सुधारणा व पुनर्वसन’ याविषयी काम करते. हातून न कळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित शिक्षेच्या रुपात बंदीजण भोगत असताना त्यांना माणूस म्हणून शिकवणदेखील कारागृहात दिली जाते. ‘जगा आणि जगू द्या’ ही शिकवण देताना बंदीजणांमध्ये दुसऱ्याप्रती आपुलकी, प्रेम वाढविण्यासाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाते. मात्र पाषाण भितींच्या आड शिक्षा भोगत असताना त्यांच्या मनात वैफल्य, निरागसतेची भावना निर्माण हाऊ नये, यासाठी कारागृह प्रशासनाने राज्यातील मध्यवर्ती कारागृहात विपश्यना केंद्र निर्माण केले आहे. विपश्यना शिबिरासाठी अत्याधुनिक हॉल, सुसज्ज व्यवस्था, स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. या विपश्यना हॉलमध्ये नुकतेच १० दिवसीय विपश्यना ध्यान, साधना शिबिर पार पडले. या शिबिरात ३० बंदीजन सहभागी झाले होते. शिबिरात कारागृह अधीक्षक एस.व्ही. खटावकर, आचार्य रुपराव मावंदे यांनी बंदीजनांना मार्गदर्शन केले. धम्मसेवक म्हणून शामराव मेश्राम, स्वप्नील नाकट, बाबाराव बनसोड हे होते. (प्रतिनिधी)
३० बंदीजनांनी घेतले विपश्यनेचे धडे
By admin | Published: January 18, 2016 12:06 AM