लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघाची प्रारुप मतदारयादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पश्चात २९,८४४ मतदारांची भर पडली आहे. मतदारांनी यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करावी, काही दुरुस्ती असल्यास G संबंधित नमुना अर्ज भरून देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केले.
आयोगाच्या निर्देशानुसार ६ ऑगस्टला सर्व मतदान केंद्र, सर्व तहसील कार्यालये तथा उपविभागीय अधिकारी कार्यालये येथे मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमात ज्यांचे मतदारयादीत नाव नाही तसेच ज्यांचे वय १ जुलै २०२४ला १८ वर्षे पूर्ण झाले आहे. अशा सर्व मतदारांची नोंदणी करता येणार आहे. याशिवाय मतदारांची नावे या केंद्रातून दुसऱ्या केंद्रात स्थलांतरित करता येणार आहेत. मृत मतदारांचे नाव कमी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली लोकसभा निवडणुकीदरम्यान यादीत नाव नसल्याबाबत काही मतदारांच्या तक्रारी प्राप्त होत्या. या सर्व मतदारांनी आपल्या नावाची खातरजमा करावी व नाव नसल्यास नमुना ६ अर्ज जवळच्या मतदान केंद्रावरील बीएलओ यांना रहिवासी व वयाचा पुराव्यासह द्यावा. तसेच VHA (Voter Help Line App) किंवा voter.eci.gov.in या पोर्टलवर ऑनलाइनसुद्धा नोंदणी करता येते. अंतिम मतदारयादी ३० ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
नवीन १८ मतदान केंद्रांची निर्मितीजिल्ह्यात २,६८२ मतदान केंद्र आहेत. यामध्ये १८ नवीन केंद्रांची निर्मिती करण्यात आलीआहे. शिवाय ७१ ठिकाणी एका केंद्राचे मतदार दुसऱ्या केंद्राला जोडले आहेत. ५९ ठिकाणी एका मतदार केंद्रामधून त्याच इमारतीमधून दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. १० मतदान केंद्रांच्या नावामध्ये बदल करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या मतदान केंद्रांमध्ये सर्व आवश्यक सुविधा करण्याचे निर्देश दिले आहे.
२० ऑगस्टपर्यंत नावनोंदणी, नावात दुरुस्तीमतदारयादीमध्ये नव्याने नाव नोंदणी, काही बदल असल्यास दुरुस्ती, नाव स्थलांतरित करणे, याबाबतची प्रक्रिया २० ऑगस्टपर्यंत करता येणार आहे. या कालावधीत १० व ११ तसेच १७ व १८ ऑगस्ट रोजी विशेष मोहीम आहे. या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर सर्व बीएलओ उपस्थित राहतील, अनुपस्थित राहिल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.