गणेश देशमुख
अमरावती : शहरातील हजारावर स्त्री-पुरुषांना डेंग्यूची लागण झाली असतानाच ३०० पेक्षा अधिक लहानग्यांनाही या जीवघेण्या आजाराने विळखा घातला असल्याचे धक्कादायक आणि चिंताजनक चित्र समोर आले आहे.महापालिका आणि शासनाचा आरोग्य विभाग डेंग्यूबाधितांचा आकड्याबाबत लपवाछपवी करीत असला तरी बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेने जिल्हाभरात किमान २०० ते ३०० बालकांना डेंग्यू झाला असल्याचे निरीक्षण ‘लोकमत’शी बोलताना नोंदविले आहे.बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेशी जिल्हाभरातील ९५ बालरोगतज्ज्ञ जुळले आहेत. त्यातील ६५ शहरांत आहेत. उर्वरित ग्रामीण भागात आहेत. संघटनेशी जुळलेल्या या संदस्यांशिवाय आणखी काही बालरोगतज्ज्ञ असतीलच, तर ते वेगळे. काही बालरोगतज्ज्ञांची प्रॅक्टिस ओथंबून वाहते, तर काहींची उत्तम चालते. एका बालरोगतज्ज्ञांकडे सरासरी १० डेंग्यूबाधित बालरुग्ण आले असण्याची शक्यता वर्तविली जाते. तथापि, ही आकडेवारी केवळ प्रतिबालरोगतज्ज्ञ दोन ते तीन इतकीच अधोरेखित केली तरी बालरुग्णांची ही सरासरी संख्या १९० ते २८५ इतकी होते. या सूत्रानुसार, जिल्हाभरात आतापर्यंत डेंग्यूच्या सरासरी ३०० बालरुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे गणित बालरोगतज्ज्ञांच्या जिल्हा संघटनेच्या अध्यक्ष डॉ. सोनाली शिरभाते यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना मांडले.खरा आकडा किती?डेंग्यूबाबत महापालिकेची कार्यप्रणाली खासगी डॉक्टरांमध्ये भीती निर्माण करणारी आहे. डेंग्यू असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितल्याचे जाहीर झाले रे झाले की, लगेच महापालिका त्यांना अधिकारांचा खाक्या दाखविते. 'कुठल्या वैद्यकीय शास्त्रानुसार तुम्ही रुग्णाला डेंग्यू असल्याचे जाहीर केले?' अशा शब्दांत महापालिकेतून डॉक्टरांना नोटीस बजावण्यात येतात. ‘दुधाने पोळलेले ताकही फुंकून पितात’ याच उक्तीप्रमाणे डॉक्टर डेंग्यूबाबतचा आकडा जाहीर करताना विशेष सावधगिरी बाळगतात. दवाखाने, रुग्णालये महापालिका हद्दीतच चालवायची असल्यामुळे ती फुल्ल असली तरी 'पानी में रह के मगरमच्छ से बैर' कोण घेणार, हा विचार डॉक्टरांवर मानसिक दडपण आणतो. खरा अधिकृत आकडा त्यामुळे बाहेर येत नाही. किमान आरोग्याबाबतची माहिती गढूळ होऊ नये, स्वच्छ सत्य बाहेर यावे, यासाठी आता जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे ‘तिसरे नेत्र’ डेंग्यू प्रकरणावर केंद्रित झाल्यास त्यातून प्रशासनाची लोकभिमुखता, लोकपयोगिता झळकू शकेल.