शहरात ६० केंद्र : चेन्नई, इंदूर, हैदराबादहून येतात रासायनिक खते मनीष कहाते अमरावतीदरवर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात शहरातील कृषी केंद्रे हाऊसफुल्ल असतात. मात्र, इतर वेळी कृषी केंद्रांत नगण्य गिऱ्हाईकी असते. शहरातील ६० कृषी केंद्रांमध्ये वर्षाकाठी ३०० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती आहे.शेतकऱ्यांची गरज म्हणजे कृषिकेंद्र आणि शेतकऱ्यांचा आत्मा म्हणजे विश्वास. कृषी केंद्रधारकांवर शेतकऱ्यांचा विश्वास बसला की दुकानदार म्हणेल ती बियाणी शेतकरी पेरतो. पेरणीनंतर निसर्गाने साथ दिली तर शेतकरी तरतो, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. देशात बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या विविध कंपन्या आहेत. कोणती कंपनी चांगली, कोणती वाईट याची शेतकऱ्यांना माहिती नसते. शहरात अधिकाधिक बियाणे आंध्र प्रदेश राज्यातून विक्रीकरिता येतात. या कंपन्यांचे काही प्रमुख वितरक व विक्रेते बाजारपेठेमध्ये आहेत. संपूर्ण जिल्ह्यात १५०० कृषी केंद्र परवानाधारक आहेत. सर्वच कृषी केंद्र धारकांना शहरातील काही अधिकृत डिलर्सकडून कृषी साहित्याची विक्री होते तर काही कृषी केंद्र संचालक थेट ओरिसा, गोवा, तामिलनाडू, आंध्रप्रदेश, मुंबई, इंदौर या ठिकाणांहून येथे कृषी साहित्य विक्रीसाठी आणतात. त्यामुळे किंमतींमध्ये तफावत भासते. काही कंपन्या दुकानदारांना वेगवेगळ्या स्किम देऊन आपलाच माल बाजारात अधिकाधिक प्रमाणात कसा विक्री होईल, यासाठी प्रलोभन देतात. कृषी केंद्र चालक आणि शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले की, उधारीवर लाखो रुपयांचे बि-बियाणे, खते आणि कीटकनाशकांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उधारीच्या पैशांवर दुकानदार अव्वाच्या सव्वा व्याज आकारत असल्याचे चित्र आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. एखाद्या वर्षी निसर्गाच्या अवकृपेने नापिकी झालीच तर शेतकरी दुकानदारांच्या पैशांची परतफेड करु शकत नसल्याचे आजवरचे चित्र आहे. यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. अशा स्थितीत शेतकरी उधारीची रक्कम परत करू शकत नाहीत. परिणामी त्याचा फटका कृषिकेंद्र चालकांना सहन करावा लागतो. कृषी केंद्रांचा परवाना मिळविण्याकरिता अनेक चकरा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात माराव्या लागतात. जिल्ह्यातील संपूर्ण कृषिकेंद्र संचालक जिल्हा परिषदेच्या अख्त्यारित येतात. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृषी केंद्रांची बहुतांश कागदपत्रे आॅनलाईन झाली आहेत. दररोज जिल्हा परिषदेंतर्गत कृषी विभागाकडून कोणती ना कोणती माहिती मागितली जाते. तसेच तपासणीच्या नावाखाली मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीला कृषी केंद्र चालकाला समोर जावे लागते. या ससेमिऱ्याला कृषी केंद्रधारक कंटाळले आहेत. यंदा दुष्काळी स्थिती असल्याने कीटकनाशकाच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. एरवी पावसाळ्यात व्यवसाय तेजीत असतो. इतर वेळी माल बुकिंगचे काम सुरु असते. - नीलेश गांधी,सचिव, जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघ, अमरावती.बी-बियाण्यांच्या कंपन्या भरपूर आहेत. त्यामुळे दुकानदारांवर विश्वास ठेवूनच बियाणे खरेदी करावे लागतात.- आशिष गावंडे, शेतकरी, अमरावती.कृषी साहित्याचे भाव खूप वाढले आहे. त्यामुळे घरगुती बियाणेदेखील काही प्रमाणात पेरावे लागतात. काही बियाणी दुकानांमधून विकत घ्यावी लागतात. - बाबासाहेब गौरखेडेशेतकरी, अमरावती.
कृषी केंद्रांमधून ३०० कोटींंची उलाढाल
By admin | Published: June 21, 2015 12:27 AM