नाफेडची खरेदी बंद
खरीप हंगामात पैशाची जुळणी करायची कशी
धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध असल्याने मागील पंधरा दिवस हरभऱ्याची खरेदी बंद होती. मात्र, कडक निर्बंध उठताच नाफेडने आता खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांच्या घरी तब्बल ३० हजार क्विंटल हरभरा पडून असल्याने खरीप हंगामासाठी पैशाची जुळवणी करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात दोन आठवडे कडक लॉकडाऊन होते. यात सर्व शासकीय कार्यालये बंद होती. तालुक्यात शेतकऱ्यांनी हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी देखील केली. आतापर्यंत २० हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. मात्र, अद्यापही ३० हजार क्विंटल हरभरा शेतकऱ्यांच्या घरी पडला आहे. एकीकडे खरीप हंगाम सुरू व्हायला अवघे दिवस शिल्लक असताना हरभऱ्याची खरेदी बंद केली. नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी सुरू करण्याची मागणी आ. प्रताप अडसड यांनी केली आहे. राज्य शासन शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. आपण जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत राज्य शासनाला पत्राद्वारे कळविले असल्याचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी सांगितले.