अमरावती : लोकसभा मतदारसंघात उमेदवारांच्या लेख्यांच्या पहिल्या तपासणीवेळी एकूण ३७ पैकी ६ उमेदवार अनुपस्थित होते. अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना ४८ तासांच्या आत निवडणूक खर्चाचे लेखे निवडणूक सनियंत्रण व खर्च कक्षात सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.
विहित मुदतीत खर्च सादर न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे कळविण्यात आले आहे. उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्याकरिता खर्च निरीक्षक अनूपकुमार वर्मा यांची नेमणूक भारत निवडणूक आयोगाने केलेली आहे. १२ एप्रिल रोजी उमेदवारांच्या लेख्यांची प्रथम तपासणी खर्च निरीक्षकांकडून करण्यात आली. यामध्ये तीन उमेदवारांनी पहिल्या तपासणीच्या वेळी त्यांच्या दैनंदिन खर्चाचा लेखा सादर केला आहे. परंतु, तो शॅडो खर्च नोंदवहीसोबत तुलनात्मकरित्या जुळून आलेला नाही तसेच त्यांच्या खर्चाचा काही भाग त्या उमेदवारांनी सादर केला नाही. अशा उमेदवारांना जिल्हाधिकारी यांनी नोटीस जारी केली आहे.
- तर शॅडो नोंदीनुसार खर्च समाविष्ट करणार१) ४८ तासांच्या आत आपले म्हणणे लिखित स्वरूपात कक्षात विहित मुदतीत सादर करावी, अन्यथा शॅडो खर्च नोंदींनुसार हा खर्च उमेदवारांना मान्य असे गृहीत धरून त्यांच्या निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येईल.
२) ही तफावत संबंधित उमेदवारास मान्य नसल्यास त्यांनी आपल्या खुलाशामध्ये तो मान्य नसल्याच्या सुस्पष्ट कारणांसह जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांकडे लिखित स्वरूपात सादर करावा लागेल.
मुदतीत खर्च सादर न केल्यास सर्व परवानग्या रद्दविहित मुदतीत खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध भादंवि कलम १७१ (१) अन्वये तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच वाहने, सभा आदीसाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवारांना दिले. त्यामुळे उमेदवारांना आता नियमित खर्च सादर करावा लागेल.