पीएम आवास योजना : ३१ आॅगस्टपर्यंत द्यावा धनाकर्ष लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. याअनुषंगाने घटक ४ मध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. याखेरीज घटक ३ मधील लाभार्थ्यांकडून ४९ हजारांचा धनाकर्ष दोन टप्प्यात भरण्यासाठी ३१ आॅगस्टची मुदत निश्चित केली आहे. राज्यात सर्वप्रथम अमरावती महापालिकेत या योजनेने गती घेतली आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारचा निधीही मिळाला आहे. ६ जुलै रोजी याबाबत मंत्रालयामध्ये पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली होती. ही संपूर्ण योजना आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असल्याने प्रत्येक घटकानुसार अंमलबजावणी करताना प्रत्यक्षात येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि उपाययोजनेच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. घटक क्र. ४ अंतर्गत महानगरपालिकेला प्राप्त २२.९९२ अर्जामधून आतापर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या नियमानुसार पहिल्या टप्प्यात ३,५०० लाभार्थी पात्र ठरलेले आहेत. पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ३,५०० लाभार्थ्यांचा राज्य व केंद्र शासनाकडे सुधारित डीपीआर सादर करण्याचे शासनाद्वारे सूचित केले आहे. सुधारित डीपीआरला मान्यता मिळाली की, त्या लाभार्थ्याला जोत्यापर्यंत बांधकाम स्वखर्चानेपूर्ण करावयाचे आहे. बांधकामाची प्रगती जीईओद्वारे छायाचित्र काढून त्याची आॅनलाईन नोंद घेण्यात येईल व त्यानंतर अनुदानाचा टप्पा देण्यात येईल. ३५ हजाराच्या पुढे जे लाभार्थी पात्र ठरतील त्याचा दुसरा डीपीआर तयार करण्यात येईल व तो शासनाकडे पाठविण्यात येईल. ४९ हजारांचा धनाकर्ष अनिवार्य घटक क्र. ३ मध्ये मंजूर प्रस्तावानुार ८६० लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी अर्जदाराला हमीपत्र व रु. ४९,००० चा डी.डी. भरावयाचा आहे. जे लाभार्थी एका टप्प्यामध्ये रु. ४९,००० चा डी.डी. भरु शकत नाहीत. त्यांना दोन टप्प्यामध्ये रक्कम भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. पहिला टप्पा जुलै महिन्यामध्ये रु. २५,००० व दुसरा टप्पा आॅगस्ट महिन्यामध्ये रु. २४,००० निश्चित करण्यात आला आहे. मंजूर प्रस्तावानुसार सुरुवातीला जे ८६० अजंदार रु. ४९,००० चा डी.डी. भरतील ते पात्र लाभार्थी म्हणून निश्चित ठरविण्यात येतील. उर्वरित म्हणजेच ८६० पुढील जे अर्जदार रु. ४९,००० डी.डी. भरतील त्यांच्यासाठी मनपाद्वारे नवीन डीपीआर तयार करुन शासनाकडे पाठविण्यात येईल. त्यामध्ये सदर लाभार्थ्याचा समावेश असेल. आतापर्यंत ज्यांनी घटक क्र. ३ मध्ये अर्जच केला नाही त्यांना अर्ज करण्याची तसेच आॅनलाईन हमीपत्र व रु. ४९,००० चा डी. डी. भरण्याची अंतिम तारीख ३१ आॅगस्ट २०१७ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे घटक क्र. ३ व घटक क्र. ४ च्या लाभार्थ्यांना नेमून दिलेल्या वेळेत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी. जेणेकरुन बहुसंख्य लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे आवाहन महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी केले आहे.
घरांसाठी ३१ जुलैची ‘डेडलाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:07 AM